जळगाव, दि. १७ – जिल्ह्यात पक्ष संघटना बळकट करण्यासाठी व विविध प्रश्नांबाबत स्थानिक पातळीवरील निर्णय घेण्याचे अधिकारी आता काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी खा.डॉ.उल्हास पाटील यांना प्रदान करण्याचे आदेश प्रांताध्यक्ष नाना पटोले यांनी दिले आहेत.
आगामी काळात होणार्या निवडणुकांच्यादृष्टीने काँग्रेस पक्षाकडुन विविध प्रकारे संघटन बळकटीसाठी युध्दपातळीवर निर्णय घेतले जात आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये काँग्रेस पक्षाला स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याला मर्यादा होत्या. मात्र आता प्रांताध्यक्ष पटोले यांनी प्रदेश काँग्रेसच्या मान्यतेने स्थानिक पातळीवर पक्ष संघटना मजबुत करण्यासाठी व विविध प्रश्नांसदर्भात निर्णय घेण्याच्या अधिकारांचे विकेंद्रीकरण करण्यात आले आहे.
त्यानुसार जळगाव जिल्हा काँग्रेस पक्षासाठी स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे अधिकार आता काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष माजी खा.डॉ.उल्हास पाटील यांना प्रदान करण्यात आले आहे. त्यांच्या सोबतीला आमदार शिरीष चौधरी यांच्यावर देखिल ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
तसेच आगामी सर्व निवडणुका, पक्ष सभासद नोंदणी कार्यक्रम, मोर्चे, आंदोलने, धरणे, निदर्शने योग्य पध्दतीने राबविण्याची जबाबदारीही डॉ.उल्हास पाटील व शिरीष चौधरी यांच्यावर सोपविण्यात आली आहे. यासंदर्भात पक्षाचे संघटन व प्रशासन सरचिटणीस प्रमोद मोरे यांनी लेखी आदेश जिल्हा काँग्रेसला पाठविले आहेत.