जामनेर, (प्रतिनिधी) : जामनेर तालुक्यातील मालदाभाडी ते वाडी किल्ला दरम्यान दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास ट्रक आणि मोटरसायकलमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात तीन लहान मुले आणि तीन वयस्क असे एकूण सहा जण जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

दुपारी चार ते सव्वाचार वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. भरधाव ट्रकने मोटरसायकलला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की मोटरसायकलवरील सर्व जण गंभीर जखमी झाले आणि जागीच त्यांचा मृत्यू झाला.

मदतकार्य आणि रुग्णालयाबाहेर गर्दी..
अपघाताची माहिती मिळताच मंत्री गिरीश महाजन यांचे कार्यकर्ते व आरोग्यदूत जालमसिंग यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. सर्व मयतांचे मृतदेह जामनेर येथील ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले आहेत. या दुर्घटनेमुळे रुग्णालयाबाहेर ग्रामस्थांची मोठी गर्दी जमली असून, मयतांची ओळख पटविण्याचे काम प्रशासनाकडून सुरू आहे.










