जळगाव, प्रतिनिधी: नवरात्रोत्सव तसेच जिल्ह्यातील विविध ठिकाणी होणारे बालाजी वहनोत्सव, रथोत्सव आणि पालखी मिरवणुकांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जळगाव जिल्ह्यातील संबंधित ठिकाणचे आठवडी बाजार नियमित दिवशी बंद ठेवण्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी रोहन घुगे यांनी दिले आहेत.

११ ते २३ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत नवरात्रोत्सव साजरा होणार आहे. तसेच ११ ते २६ ऑक्टोबरदरम्यान चोपडा, धरणगाव, पारोळा, भडगाव आणि मेहुणबारे येथे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या काळात दुर्गादेवी विसर्जन मिरवणुका, रथोत्सव आणि पालखी सोहळ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.

मुंबई मार्केट अँड फेअर्स ॲक्ट, १८६२ मधील कलम ५ (अ) व ५ (क) अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून ११ ते २६ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत चोपडा, धरणगाव, पारोळा, भडगाव, मेहुणबारे तसेच जिल्ह्यातील इतर संबंधित ठिकाणचे आठवडी बाजार नियमित दिवशी बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

दरम्यान, नागरिक आणि व्यापाऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी संबंधित नगर परिषदा, नगर पंचायती व स्थानिक प्रशासनाने हे आठवडी बाजार नियमित दिवसाऐवजी अन्य सोयीस्कर दिवशी भरविण्याबाबत आवश्यक कार्यवाही करावी, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
धार्मिक उत्सवांच्या काळात गर्दीचे नियोजन, वाहतूक व्यवस्था आणि कायदा व सुव्यवस्था सुरळीत ठेवण्याच्या दृष्टीने प्रशासनाने हे पाऊल उचलले आहे.









