जळगाव प्रतिनिधी अडावद पोलिस ठाण्याच्या हद्दीतील देवझिरी गावाजवळील शेतशिवारात तुरीच्या पिकामध्ये गांजाची लागवड केल्याचे आढळून आले. पोलिसांनी कारवाई करून गांजाची १७५ झाडे जप्त केली असून, देवसिंह बरेला याला ताब्यात घेण्यात आले आहे.

डीवायएसपी सुनील पाटील आणि अडावद पोलिस ठाण्याचे प्रभारी एपीआय प्रशांत कंधारे यांच्या नेतृत्वाखाली ८ सप्टेंबर रोजी ही कारवाई करण्यात आली. तुरीच्या पिकामध्ये गांजाची झाडे लावण्यात आल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी संबंधित शेतशिवाराची पाहणी केली. त्यावेळी हा प्रकार समोर आला.

देवझिरी परिसर मध्य प्रदेशाच्या सीमेलगत आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी केलेल्या कारवाईत १७५ गांजाची झाडे जप्त करण्यात आली. जप्त मुद्देमालाचे वजन आणि किंमत निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
या प्रकरणी पुढील कायदेशीर कारवाई सुरू असून, गांजाच्या लागवडीमागील अन्य व्यक्तींचा सहभाग आहे का, याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.









