जळगाव, दि.12 – केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयांतर्गत येणाऱ्या क्षेत्रीय लोक संपर्क ब्युरो, जळगाव तर्फे जळगाव शहर आणि आसपासच्या गावांमध्ये राष्ट्रीय युवा महोत्सव, कोविड- 19 सह लसीकरणाबाबत प्रचार वाहना द्वारे जनजागृती करण्यात येत आहे. स्वामी विवेकानंद यांच्या जयंती दिनी देशात राष्ट्रीय युवा दिन साजरा केला जातो. यानिमित्त केंद्र सरकार मार्फत देशात २५ वा राष्ट्रीय युवा महोत्सव साजरा करण्यात येत आहे. याच अनुषंगाने माहिती आणि प्रसारण मंत्रालया अंतर्गत येणार्यास क्षेत्रीय लोक संपर्क ब्यूरो, जळगाव तर्फे जळगाव शहर आणि परिसरातील गावांमध्ये आजपासून दोन दिवस राष्ट्रीय युवा दिवस आणि कोविड- 19 व लसीकरण या विषयावरील जनजागृती चित्ररथाच्या माध्यमातून ध्वनी फित द्वारे जनजागृती करण्यात येत आहे.
जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते या जनजागृती मोहिमेचे उदघाटन करण्यात आले. त्यांनी या चित्ररथाच्या माध्यमातून COVID-19 संदर्भातील दिशानिर्देश व लसीकरणा बाबतची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचेल, अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, निवासी उपजिल्हाधिकारी, राहुल पाटील, उपजिल्हाधिकारी तुकाराम हुलवळे (निवडणूक), उपजिल्हाधिकारी (महसूल प्रशासन) शुभांगी भारदे, तहसीलदार जितेंद्र कुवर, सुरेश थोरात, नायब तहसिलदार सुनील समदाणे, श्री. कळसकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्विरतेकरिता क्षेत्रीय लोक संपर्क ब्यूरो, जळगावचे क्षेत्रीय प्रचार अधिकारी प्रदीप पवार सहकारी बापू पाटील, किरण कुमार वर्मा यांनी परिश्रम घेतले.