जळगाव, (प्रतिनिधी) : जळगाव जिल्हा पोलीस दलाकडून अंमली पदार्थ विरोधी कायद्यान्वये दाखल असलेल्या विविध गुन्ह्यांमधील जप्त मुद्देमालाची विल्हेवाट लावण्यात आली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली एकूण ८ गुन्ह्यांमधील १,८६,१६,४०० रुपये किमतीचा आणि १३०.८२ किलो वजनाचा सुका गांजा संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करून नष्ट करण्यात आला.

सर्वोच्च न्यायालय, केंद्र सरकार, पोलीस महासंचालक (महाराष्ट्र राज्य, मुंबई) आणि विशेष पोलीस महानिरीक्षक (ANTF, मुंबई) यांनी दिलेल्या निर्देश व सूचनेनुसार ही कारवाई करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक तथा नोडल अधिकारी (अंमली पदार्थ विरोधी पथक) राहुल गायकवाड यांनी जळगाव येथील केंद्रीय मुद्देमाल कक्षात जमा असलेल्या या अंमली पदार्थांचा आढावा घेतला होता.

सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता झाल्यानंतर आज दिनांक ०६ जुलै रोजी जिल्हापेठ पोलीस स्टेशन इमारतीमागील मोकळ्या जागेत जिल्हास्तरीय समितीसमोर खड्डा खोदून, पर्यावरणाची कमीत कमी हानी होईल अशा पद्धतीने हा गांजा नष्ट करण्यात आला. या संपूर्ण प्रक्रियेचे व्हिडिओ चित्रीकरणही करण्यात आले आहे.

ही कारवाई जिल्हास्तरीय अंमली पदार्थ नाश समितीचे अध्यक्ष तथा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदिप गावीत, पोलीस उपअधीक्षक (गृह) संजय गायकवाड, कृषी विभागाचे प्रतिनिधी विकास बोरसे आणि वजन मापे निरीक्षक गौतम बाविस्कर यांच्या उपस्थितीत पार पडली. पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे स.फौ. संजय दोरकर, पोहेकॉ संदिप पाटील, संदिप चव्हाण, जयंत चौधरी आणि राहुल बैसाणे यांच्या पथकाने या कारवाईची यशस्वी पूर्तता केली.







