जळगाव, (प्रतिनिधी) : मोहफुलांकडे केवळ दारू निर्मितीचे साधन म्हणून न पाहता, त्यापासून पौष्टिक पदार्थ बनवल्यास महिला सबलीकरणासोबतच उपजीविकेच्या मोठ्या संधी उपलब्ध होतील, असा विश्वास आदिवासी विकास विभाग यावलचे सहायक प्रकल्पाधिकारी सतिश पाटील यांनी व्यक्त केला.
रोटरी क्लब जळगाव आणि गांधी रिसर्च फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोहफुलांपासून पौष्टिक पदार्थ बनविण्याच्या दोन दिवसीय कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर सरपंच दत्तर सिंग पावरा, वनरक्षक विजय शिरसाठ, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. सतिश गोगुलवार, रोटरीचे अध्यक्ष गिरीश कुळकर्णी, सचिव सुभाष अमळनेरकर आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यशाळेत मोहफुलांचा चिवडा, मोहफुलांचे लाडू व केक बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. कार्यशाळेस ३८ आदिवासी भगिनींनी सहभाग घेतला आहे. दोन दिवसीय कार्यशाळेचा समारोप शुक्रवार, दि. २७ मार्च रोजी होणार आहे.
डॉ. सतीश गोगुलवार यांचे आज जळगावात व्याख्यान
कार्यशाळेचे मुख्य प्रशिक्षक आणि आंतरराष्ट्रीय मानवतावादी पुरस्कार विजेते डॉ. सतीश गोगुलवार यांचे आज शुक्रवार, २७ मार्च रोजी सायंकाळी ७:३० वाजता जळगावात जाहीर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. ‘आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ या विषयावर रोटरी हॉल, गणपती नगर येथे ते मार्गदर्शन करणार आहेत. गडचिरोलीत चार दशकांपासून आरोग्य आणि जल-जंगल-जमीन या विषयावर काम करणाऱ्या डॉ. गोगुलवार यांच्या विचारांचा लाभ घेण्याचे आवाहन गांधी रिसर्च फाऊंडेशन आणि रोटरी क्लबने केले आहे.







