जळगाव, (प्रतिनिधी) : शहरातील रामेश्वर कॉलनी परिसरात माणुसकीला आणि नात्याला काळिमा फासणारी एक अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. एका ३१ वर्षीय महिलेला गुंगीचे पेय देऊन तिच्यावर दोन नराधम नातेवाईकांनी आळीपाळीने अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एमआयडीसी पोलिसांनी एका आरोपीला तातडीने अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिलेवर १३ मार्चच्या रात्री ११:३० ते १४ मार्चच्या पहाटे २ वाजेच्या सुमारास हा घृणास्पद प्रकार घडला. पीडितेचे नातेवाईक असलेल्या दोन आरोपींनी तिला गाठले. यावेळी मुख्य आरोपी राजेश शिवराम पवार याने पीडितेला गुंगीचे पेय पाजले. पेय प्यायल्यानंतर महिला बेशुद्ध झाली. याच स्थितीचा फायदा घेत राजेश पवार आणि त्याचा साथीदार राजेंद्र शंकरसिंह पवार या दोघांनी पीडितेच्या संमतीशिवाय तिच्यावर आळीपाळीने अत्याचार केला.
शुद्धीवर आल्यानंतर पीडित महिलेने या अत्याचाराविरोधात धाडस दाखवत तक्रार देण्याचा निर्णय घेतला. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक माधुरी बोरसे यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पीडितेचा सविस्तर जबाब नोंदवला. या जबाबावरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी आरोपी राजेश शिवराम पवार याला बेड्या ठोकल्या आहेत. दुसरा आरोपी राजेंद्र पवार याचा शोध सुरू आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि गणेश वाघ या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.







