जळगाव, (प्रतिनिधी) : एका अल्पवयीन मुलीचे आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तिचा वेळोवेळी विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी जळगाव जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, धुळे येथील संशयित आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, धुळे येथील हुजेफ युनूस पिंजारी (वय १९) याने जळगाव तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन विद्यार्थिनीचे आक्षेपार्ह व्हिडिओ तयार केले होते. हे व्हिडिओ त्याने एका खासगी क्लासचे स्वच्छतागृह आणि शहरातील एका हॉटेलच्या रूममध्ये तयार केले होते. नोव्हेंबर २०२४ ते फेब्रुवारी २०२६ या कालावधीत हा प्रकार सुरू होता. संशयित आरोपी हुजेफ हा संबंधित विद्यार्थिनीला तिचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची सातत्याने धमकी देत होता. या धमकीच्या बळावर त्याने वेळोवेळी पीडितेचा विनयभंग केला.
आरोपी एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने पीडितेशी वारंवार मोबाईलवर संपर्क साधून तिला अधिक व्हिडिओ आणि तिचे विवस्त्र फोटो पाठवण्यासाठी दबाव टाकला होता. या जाचाला कंटाळून अखेर पीडित मुलीने धाडस करत पोलीस प्रशासनाकडे दाद मागितली.
पीडितेने दिलेल्या तक्रारीवरून जळगाव येथील जिल्हापेठ पोलीस ठाण्यात हुजेफ पिंजारी याच्याविरुद्ध भारतीय दंड विधान संहिता आणि पोक्सो (POCSO) कायद्याच्या विविध कलमान्वये विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवत आरोपीला अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, महिला आणि मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.







