चोपडा, (प्रतिनिधी) : तालुक्यातील अकुलखेडा येथे आज काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली. प्रेमप्रकरणातून उद्भवलेल्या वादाचे पर्यावसान थेट हत्येत झाले असून, एका तरुणाने आपल्या विवाहित प्रेयसीवर गोळ्या झाडून तिची हत्या केली आणि त्यानंतर स्वतःवरही गोळी झाडून जीवनयात्रा संपवली. या घटनेमुळे संपूर्ण जळगाव जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
अकुलखेडा येथील रहिवासी अनिता पाटील (वय अंदाजे ३२) आणि शिरपूर येथील देवानंद धनगर यांची काही महिन्यांपूर्वी इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ओळख झाली होती. या ओळखीचे रूपांतर हळूहळू प्रेमसंबंधात झाले. मात्र, गेल्या काही दिवसांपासून अनिताने देवानंदसोबतचे संबंध तोडण्याचा प्रयत्न केला होता. ती त्याला टाळत असल्याने देवानंदच्या मनात राग धुमसत होता. याच रागातून त्याने हा टोकाचा निर्णय घेतल्याचे समजते.

शनिवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास अनिता यांची मुलगी शाळेतून घरी परतली. घराचा दरवाजा आतून बंद असल्याने तिने तो ढकलून उघडला. समोरचे दृश्य पाहताच तिची वाचाच बसली. आई अनिता आणि एक अनोळखी तरुण रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत पडलेले होते. घाबरलेल्या मुलीने वडील जगदीश पाटील यांना फोन करून माहिती दिली. जगदीश पाटील यांनी घरी धाव घेत तातडीने पोलिसांना पाचारण केले.
घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली. प्राथमिक तपासात असे दिसून आले की, देवानंदने आधी अनितावर गोळ्या झाडल्या आणि त्यानंतर त्याच शस्त्राने स्वतःला संपवले. सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे देवानंदकडे बंदूक कुठून आली? तो ती शिरपूरवरून घेऊन आला होता का? याचा तपास पोलीस करत आहेत. या घटनेमुळे पाटील कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, शांत असलेल्या अकुलखेडा गावात सध्या शोककळा पसरली आहे.







