वरणगाव, (प्रतिनिधी) : भुसावळ तालुक्यातील पिंपळगाव खुर्द येथे गेल्या १५ दिवसांपासून एका माकडाने अक्षरशः धुमाकूळ घातला असून, संपूर्ण गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. या माकडाने आतापर्यंत तब्बल ३५ ग्रामस्थांवर हल्ला करून त्यांना जखमी केले आहे. माकडाच्या या हिंसक रूपामुळे नागरिकांना घराबाहेर पडणेही कठीण झाले असून, वनविभागाच्या संथ कारभारावर संताप व्यक्त केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी पिंपळगाव परिसरात माकडांची एक टोळी आली होती. त्यातील इतर माकडं निघून गेली असली, तरी एक माकड गावातच थांबले आहे. हे माकड आता हिंसक झाले असून, घरात घुसून महिला आणि वृद्धांवर अचानक झडप घालत आहे. इतकेच नव्हे तर स्वयंपाकघरातील वस्तूंची नासधूस करून हे माकड मोठे नुकसान करत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
माकडाच्या हल्ल्याची तीव्रता इतकी भीषण आहे की, एका ग्रामस्थाला माकडाने घराच्या गच्चीवरून ढकलून दिले. यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर भुसावळ येथील खासगी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात (ICU) उपचार सुरू आहेत. याशिवाय अन्य ३५ जण या माकडाच्या चाव्यामुळे जखमी झाले आहेत.
या संकटामुळे गावकरी दिवसाही घराबाहेर पडण्यास घाबरत आहेत. पालकांनी भीतीपोटी मुलांना शाळेत पाठवणे बंद केले असून, शेतमजुरांनी शेतात जाणे टाळले आहे. आता प्रशासनाने या प्रकरणी गांभीर्याने लक्ष देऊन गावकऱ्यांना या त्रासातून मुक्त करावे, अशी मागणी जोर धरत आहे.







