जळगाव, (प्रतिनिधी) : येथील श्री. संत ज्ञानेश्वर विद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात आणि चैतन्यमय वातावरणात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात मुख्याध्यापक मुकेश नाईक यांच्या हस्ते शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी त्यांनी महाराजांच्या अष्टपैलू व्यक्तित्वाचे महत्त्व विषद केले.
विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांच्या जोरावर कार्यक्रमात रंगत आणली. शिवचरित्रावर आधारित अंगावर शहारे आणणारे पोवाडे, स्फूर्तीदायक देशभक्तीपर नृत्य आणि शिवरायांच्या पराक्रमावर आधारित प्रभावी भाषणे सादर करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या या दमदार सादरीकरणामुळे संपूर्ण शालेय परिसर ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या जयघोषाने निनादून गेला होता.
या विशेष कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रूपाली आव्हाड यांनी केले. कार्यक्रमाला विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. समारोपप्रसंगी बोलताना, विद्यार्थ्यांनी शिवरायांच्या जीवनातील शौर्य, धैर्य आणि अद्वितीय नेतृत्वगुणांचा आदर्श आपल्या वैयक्तिक आयुष्यात जोपासावा, असे आवाहन करण्यात आले.







