जळगाव, (प्रतिनिधी) : राष्ट्रभक्तीची मशाल प्रज्वलित ठेवणाऱ्या आणि प्रत्येक भारतीयाच्या अंगावर रोमांच उभे करणाऱ्या ‘वंदे मातरम्’ या गीताला यावर्षी १५० वर्षे पूर्ण होत आहेत. या ऐतिहासिक पर्वाचे औचित्य साधून, बालविश्व प्राथमिक शाळेत प्रजासत्ताक दिनानिमित्त एका अत्यंत नावीन्यपूर्ण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शाळेच्या शेकडो विद्यार्थ्यांनी मैदानावर एकत्र येत आपल्या माध्यमातून (मानवी साखळी) ‘वंदे मातरम्’ अशी अक्षरे साकारून सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
मैदानी कवायतीतून राष्ट्रभक्तीचा जागर..
शाळेचे क्रीडा शिक्षक धीरज जावळे यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली हा स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला. केवळ घोषणा न देता, प्रत्यक्ष कृतीतून शिस्त आणि राष्ट्रप्रेम कसे जोपासता येते, याचा आदर्श या विद्यार्थ्यांनी घालून दिला. अतिशय कल्पकतेने केलेल्या या मैदानी कवायतीमध्ये विद्यार्थ्यांनी ‘वंदे मातरम्’ हे नाव मैदानावर साकारले.
राष्ट्रकवी बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी रचलेल्या या गीताने स्वातंत्र्यलढ्यात मोलाची भूमिका बजावली होती. या गीताच्या दीडशेव्या वर्षानिमित्त बालवयातच विद्यार्थ्यांच्या मनात देशाभिमान जागृत व्हावा, या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध कवायतींचे सादरीकरण करत तिरंग्याला मानवंदना दिली.

प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याला उपस्थित असलेल्या पालक आणि ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांच्या या नावीन्यपूर्ण प्रयोगाचे टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत केले. शाळेच्या मुख्याध्यापकांनी आणि व्यवस्थापन समितीने या यशस्वी उपक्रमाबद्दल विद्यार्थी व क्रीडा शिक्षकांचे विशेष अभिनंदन केले आहे.







