जळगाव, (प्रतिनिधी) : निवडणुकीच्या प्रचाराने आता आज अंतिम टप्पा गाठला असून, जळगावमधील प्रभाग १३ मध्ये महायुतीने आपली पूर्ण ताकद झोकून दिली आहे. महायुतीचे ‘ड’ चे उमेदवार प्रफुल्ल देवकर आणि ‘ब’ च्या उमेदवार सुरेखा नितीन तायडे यांच्या प्रचारार्थ आज परिसरात भव्य दुचाकी रॅली काढण्यात आली. या रॅलीच्या माध्यमातून महायुतीने प्रभागात जोरदार वातावरण निर्मिती करत विरोधकांसमोर मोठे आव्हान उभे केले आहे.
प्रमुख उपनगरांमध्ये रॅलीचे जंगी स्वागत..
ही दुचाकी रॅली देवेंद्र नगर, मोहन नगर, रायसोनी नगर, संभाजी नगर, दौलत नगर आणि नेहरू नगर या प्रमुख भागांतून काढण्यात आली. हातात महायुतीचे झेंडे आणि ‘विजय असो’च्या घोषणा देत कार्यकर्त्यांनी संपूर्ण परिसर भगवामय केला होता. रॅली मार्गावर ठिकठिकाणी नागरिकांनी उमेदवारांचे स्वागत केले. ज्यामुळे वातावरणात मोठा उत्साह दिसून आला.
विकासासाठी महायुतीला साथ द्या: नेत्यांचे आवाहन
माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांनी मतदारांना आवाहन करताना सांगितले की, “प्रफुल्ल देवकर आणि त्यांच्या पॅनेलला प्रचंड बहुमताने विजयी करून विकासाची संधी द्यावी.”
यावेळी बोलताना उमेदवार प्रफुल्ल देवकर आणि सुरेखा तायडे यांनी आपला संकल्प व्यक्त केला. “प्रभागातील रस्ते, ड्रेनेज आणि पाणीपुरवठा यांसारख्या मूलभूत सुविधांना आम्ही सर्वोच्च प्राधान्य देऊ. केवळ आश्वासनच नाही, तर प्रभाग १३ ला एक ‘आदर्श प्रभाग’ म्हणून विकसित करू,” असा विश्वास त्यांनी मतदारांना दिला.
या भव्य रॅलीमुळे प्रभाग १३ मध्ये महायुतीचे पारडे जड झाल्याचे चित्र दिसत असून, मतदारांमध्येही या पॅनेलबाबत मोठी उत्सुकता पाहायला मिळत आहे.







