जळगाव, (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) गटाचे प्रभाग क्रमांक १२ ‘अ’ चे उमेदवार ललितकुमार घोगले आणि १२ ‘ड’ चे उमेदवार सुरेश पोपट पवार यांच्या प्रचाराने रविवारी समता नगर परिसरात चांगलाच जोर धरला. काढण्यात आलेल्या भव्य प्रचार फेरीला महिला आणि ज्येष्ठ नागरिकांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे या भागात घोगले आणि पवार यांचे पारडे जड असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
सकाळी १० वाजता समता नगरमधून या प्रचार फेरीला प्रारंभ झाला. यावेळी संपूर्ण परिसर राष्ट्रवादीमय झाला होता. ठिकठिकाणी महिलांनी घराबाहेर येत उमेदवारांना पेढे भरवून त्यांचे औक्षण केले आणि विजयाचा टिळा लावला. ज्येष्ठ नागरिकांनी उमेदवारांना पुष्पहार घालून विजयासाठी आशीर्वाद दिले. कार्यकर्त्यांच्या जोरदार घोषणाबाजीने आणि नागरिकांच्या उत्साहाने प्रचारात मोठी रंगत आणली.
ललितकुमार घोगले आणि सुरेश पवार यांनी यावेळी घरोघरी जाऊन मतदारांशी थेट संवाद साधला. प्रभागातील प्रलंबित प्रश्न, रस्ते, पाणी आणि स्वच्छतेच्या समस्या प्राधान्याने सोडवण्याचे आश्वासन त्यांनी दिले. “स्थानिक विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत,” असा विश्वास उमेदवारांनी यावेळी व्यक्त केला.
या प्रचार फेरीत राहुल सुरवाडे, भीमराव पवार, केतन पवार, जिगर अहिरे, प्रशांत सूर्यवंशी, सुमित परदेशी, अंकित मौर्य, अतुल पवार, सागर केदार, गजानन पाटील, प्रसाद महाजन, आरती घोगले, प्रेमा पेशट्टीवार, पवन घुसाळ, रफिक पिंजारी, मीना जाधव, गणेश जाधव, उमेश वाघ यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.








