जळगाव, (प्रतिनिधी) : निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतर प्रभाग १३ मधील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. आज, १० तारखेला राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि भारतीय जनता पक्ष महायुतीच्या उमेदवारांनी मोहाडी रोड परिसरातील ओम शांती नगर येथून आपल्या प्रचार रॅलीचा जोरदार प्रारंभ केला.
या रॅलीने आदर्श नगर, रुस्तमजी शाळा आणि आरटीओ कार्यालयामागील परिसर अशा विविध भागांत मार्गक्रमण केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) उमेदवार प्रफुल्ल देवकर, भाजपच्या उमेदवार सुरेखा नितीन तायडे आणि नितीन सपके यांनी घरोघरी जाऊन नागरिकांच्या भेटी घेतल्या. केवळ मतदानाचे आवाहन न करता, उमेदवारांनी स्थानिक रहिवाशांच्या समस्या जाणून घेतल्या आणि प्रभागाच्या विकासाचा शब्द दिला.
या प्रचार रॅलीला कार्यकर्त्यांचा आणि स्थानिक नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला. ठिकठिकाणी उमेदवारांचे स्वागत करण्यात आले. यावेळी महायुतीचे पदाधिकारी रोहिदास पाटील, तन्मय चौधरी, ललित पाटील, राजेंद्र पाटील, रवी पाटील, दीपक पाटील, ललित देशमुख, रामेश्वर कोळी, शरद पवार यांसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते व महिला उपस्थित होत्या. प्रभागातील रखडलेले प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन देत उमेदवारांनी प्रचारात आघाडी घेतल्याचे चित्र आजच्या रॅलीतून पाहायला मिळाले.








