जळगाव, (प्रतिनिधी) : जळगाव शहर महानगरपालिकेच्या रणधुमाळीत प्रभाग क्रमांक १३ मधील राजकीय वातावरण आता निर्णायक वळणावर येऊन ठेपले आहे. यंदाच्या निवडणुकीत या प्रभागात अपक्ष उमेदवारांची मोठी गर्दी असली, तरी सुजाण मतदारांचा कौल मात्र स्पष्टपणे ‘महायुती’ च्या बाजूने झुकताना दिसत आहे. “प्रभागाचा विकास हवा असेल, तर सत्तेसोबत राहणेच फायद्याचे,” हा विचार सध्या येथील जनमानसात रुजला आहे.
प्रभाग १३ मधील नागरिकांशी संवाद साधला असता, एक महत्त्वाची बाब समोर आली आहे. अपक्ष उमेदवार निवडून आल्यावर प्रभागातील विकासकामांसाठी निधी खेचून आणताना मर्यादा येतात. याउलट, महायुतीसारख्या मोठ्या आघाडीचा लोकप्रतिनिधी असल्यास रस्ते, पाणी आणि स्वच्छतेसारखे प्रलंबित प्रश्न मार्गी लागणे सुलभ होते. याच तांत्रिक आणि व्यवहार्य कारणामुळे नागरिक आता अपक्षांच्या भावनिक आवाहनाऐवजी महायुतीच्या ‘विकासाच्या राजकारणाला’ पसंती देत आहेत.
या प्रभागात महायुतीने अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने आपले तगडे उमेदवार मैदानात उतरवले आहेत. प्रभाग १३ ‘अ’ आणि ‘ब’: भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. प्रभाग १३ ‘ड’: राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) निवडणूक लढवत आहे.
या दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी सध्या प्रभागात प्रचाराचा धडाका लावला असून, राज्य सरकारच्या माध्यमातून झालेली जनहितार्थ कामे ते मतदारांपर्यंत पोहोचवत आहेत. निवडणुकीच्या रिंगणात उमेदवारांची संख्या मोठी असली, तरी मतदार मात्र गोंधळलेल्या स्थितीत नाहीत. कोणत्याही प्रलोभनांना बळी न पडता, केवळ शाश्वत विकास आणि स्थिर प्रशासन या मुद्द्यांवर नागरिक आपला कौल देणार असल्याचे चित्र आहे. “प्रभागाचा कायापालट करण्यासाठी सत्ताधारी पक्षाचा पाठिंबा असलेला उमेदवार असणे ही काळाची गरज आहे,” अशी भावना नागरिकांमध्ये प्रबळ झाली आहे.
प्रभाग १३ मध्ये महायुतीने विकासाचा जो ‘झंझावात’ निर्माण केला आहे, त्यापुढे बंडखोर आणि अपक्ष उमेदवारांचे आव्हान फिके पडताना दिसत आहे. मतदानाच्या दिवशी नागरिक विकासाच्या बाजूने आपली मोहोर उमटवतील, अशी सध्याची परिस्थिती आहे.








