प्रभाग १० आणि ८ मध्ये भगवे वादळ; महिलांकडून औक्षण तर तरुणांच्या घोषणाबाजीने परिसर दणाणला
जळगाव, (प्रतिनिधी) : निवडणुकीच्या रणधुमाळीत जळगाव शहरात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. प्रभाग क्रमांक १० (ड) मधील उमेदवार कुलभूषण पाटील आणि प्रभाग क्रमांक ८ (अ) मधील उमेदवार उज्वला कुलभूषण पाटील यांच्यासह शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उमेदवारांनी प्रचारात मोठी आघाडी घेतली आहे. गुरुवारी काढण्यात आलेल्या भव्य प्रचार रॅलीला नागरिकांनी दिलेल्या प्रचंड प्रतिसादामुळे संपूर्ण परिसरात ‘भगवेमय’ वातावरण पाहायला मिळाले.
भव्य रॅली आणि जनसंवाद..
या प्रचार रॅलीची सुरुवात अत्यंत उत्साही वातावरणात झाली. खंडेराव नगर, भैरव नगर आणि मयूर कॉलनी या प्रमुख भागांतून ही रॅली काढण्यात आली. रॅली दरम्यान ठिकठिकाणी महिलांनी उमेदवारांचे औक्षण करून त्यांना विजयासाठी आशीर्वाद दिले, तर तरुणांनी दिलेल्या जोरदार घोषणाबाजीमुळे परिसर दणाणून गेला होता. उमेदवारांनी यावेळी घराघरांत जाऊन नागरिकांशी थेट संवाद साधला आणि त्यांच्या समस्या जाणून घेत जनसंपर्क अधिक दृढ करण्यावर भर दिला.
या रॅलीत शिवसेनेचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सहभागी होत आपली ताकद दाखवून दिली. यामध्ये प्रामुख्याने विनोद निकम, विकास चौधरी, आसिफ शेख, पंकज पाटील, राहुल पाटील, दीपक पवार, सागर सोमानी, विजय निकम यांच्यासह शेकडो शिवसैनिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यकर्त्यांच्या अफाट गर्दीमुळे ही रॅली म्हणजे एक प्रकारे शक्तीप्रदर्शनच ठरले. ”प्रभागातील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले प्रश्न मार्गी लावणे आणि विकासाला गती देणे हेच आमचे मुख्य उद्दिष्ट आहे. नागरिकांकडून मिळणारा पाठिंबा आमचा आत्मविश्वास वाढवणारा आहे,” असे मत यावेळी उमेदवारांनी व्यक्त केले.








