जळगाव, (प्रतिनिधी) : जळगाव महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, प्रभाग क्रमांक १२ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या वतीने प्रचार फेरी काढण्यात आली. माजी आमदार संतोष चौधरी आणि जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत निघालेल्या या रॅलीला नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला.
प्रभाग १२ मधील पक्षाचे अधिकृत उमेदवार ललितकुमार रामकिशोर घोगले आणि सुरेश पोपट पवार यांच्या प्रचारार्थ दि. ५ जानेवारी रोजी ही फेरी काढण्यात आली. एम. जे. कॉलेज परिसरापासून रॅलीला सुरुवात झाली. त्यानंतर ओंकारेश्वर मंदिर आणि सागर पार्क या परिसरातून ही फेरी मार्गस्थ झाली. ठिकठिकाणी उमेदवारांचे स्वागत करण्यात आले आणि मतदारांशी थेट संवाद साधण्यात आला.

या प्रचार फेरीत माजी आमदार संतोष चौधरी, जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील, महानगराध्यक्ष एजाज अब्दुल गफ्फार मलिक, दिलीप खोडपे सर आणि रमेश पाटील यांसारख्या ज्येष्ठ नेत्यांनी सहभाग नोंदवून उमेदवारांना बळ दिले. प्रभागाच्या विकासासाठी आणि प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसला (शरदचंद्र पवार पक्ष) साथ देण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
कार्यकर्त्यांचा उत्साह प्रचार फेरीत पक्षाचे असंख्य महिला व पुरुष कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. हातात पक्षाचे झेंडे आणि घोषणाबाजीमुळे संपूर्ण परिसर राष्ट्रवादीमय झाला होता. स्थानिक नागरिकांनीही या फेरीचे ठिकठिकाणी स्वागत करून उमेदवारांना आपला पाठिंबा दर्शवला. आगामी निवडणुकीत प्रभाग १२ मध्ये परिवर्तनाचे वारे वाहत असल्याचे चित्र या निमित्ताने पाहायला मिळाले.








