जळगाव, (प्रतिनिधी) : जळगाव शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून, प्रभाग १३ मध्ये महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचाराचा नारळ मोठ्या उत्साहात फोडण्यात आला. यावेळी विद्यमान आमदार राजूमामा भोळे आणि माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला.
महादेव मंदिरात पूजनाने सुरुवात..
प्रचाराचा प्रारंभ रायसोनी नगर येथील महादेव मंदिरात अभिषेक व पूजेने झाला. प्रभाग १३ मधील महायुतीचे अधिकृत उमेदवार नितीन सपके (१३ अ), सुरेखा नितीन तायडे (१३ ब), वैशाली अमित पाटील (१३ क – बिनविरोध निश्चित) आणि प्रफुल्ल गुलाबराव देवकर (१३ ड) यांनी प्रारंभी श्रीरामाच्या चरणी नतमस्तक होऊन विजयाचा संकल्प केला. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते विजयाचा नारळ वाढवून प्रचाराची अधिकृत घोषणा करण्यात आली.
ढोल-ताशांचा गजर आणि फटाक्यांची आतषबाजी..
प्रचाराचा श्रीगणेशा होताच कार्यकर्त्यांनी फटाक्यांची मोठी आतषबाजी केली, ज्यामुळे परिसर दणाणून गेला होता. ढोल-ताशांच्या गजरात निघालेल्या या भव्य प्रचार रॅलीने संपूर्ण प्रभागाचे लक्ष वेधून घेतले. यावेळी महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते, त्यांनी दिलेल्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.
घरोघरी संवाद आणि महिलांकडून औक्षण..
रॅली दरम्यान सर्व उमेदवारांनी प्रभागातील घराघरांत जाऊन मतदारांशी प्रत्यक्ष संवाद साधला. ज्येष्ठांचे आशीर्वाद घेत त्यांनी प्रभागाच्या विकासाचा शब्द दिला. ठिकठिकाणी गृहिणींनी उमेदवारांचे औक्षण केले तर काही ठिकाणी पुष्पहार घालून त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. मतदारांकडून मिळणारा हा सकारात्मक प्रतिसाद पाहता महायुतीच्या गोटात उत्साहाचे वातावरण आहे.
विकासकामांच्या मुद्द्यांवर भर..
प्रभाग १३ मधील रस्ते, पाणी आणि स्वच्छतेसह प्रलंबित नागरी समस्या सोडवण्याचे आश्वासन उमेदवारांनी यावेळी दिले. विकासाचा अजेंडा घेऊन रिंगणात उतरलेल्या महायुतीच्या या उमेदवारांमुळे प्रभागातील लढत अत्यंत चुरशीची ठरणार असल्याचे चित्र सध्यातरी दिसत आहे.








