जळगाव, (प्रतिनिधी) : “जळगावात महायुतीला मिळत असलेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता, महायुतीचे उमेदवार प्रचंड बहुमताने निवडून येतील यात शंका नाही. २०४७ पर्यंत ‘विकसित भारत’ घडवण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी महायुतीचे नेते अहोरात्र प्रयत्न करत असून, या विकासाच्या प्रवासात जनतेची भक्कम साथ हवी आहे,” अशी साद भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी घातली.
रविवारी ४ जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजता जळगावात आयोजित महायुतीच्या भव्य मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मंत्री गिरीश महाजन, मंत्री संजय सावकारे, खासदार स्मिता वाघ, आमदार मंगेश चव्हाण, आमदार राजूमामा भोळे, आमदार किशोर पाटील, आमदार अमोल जावळे, माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे आणि राष्ट्रवादीचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्यासह महायुतीचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
नगरसेवकांचा सत्कार आणि ‘वचननामा’ प्रकाशित..
कार्यक्रमाच्या सुरुवातीला महायुतीकडून बिनविरोध निवडून आलेल्या १२ नगरसेवकांचा मान्यवरांच्या हस्ते जाहीर सत्कार करण्यात आला. जळगाव शहराच्या विकासाची दिशा स्पष्ट करणारा ‘महायुतीचा वचननामा’ देखील यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आला.
बंडखोरीला लगाम; अपक्षांचा महायुतीला पाठिंबा
या मेळाव्याचे मुख्य आकर्षण म्हणजे निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या अनेक अपक्ष आणि बंडखोर उमेदवारांनी महायुतीच्या अधिकृत उमेदवारांना दिलेला जाहीर पाठिंबा. यामध्ये प्रामुख्याने:
प्रिया विनोद तायडे (प्रभाग १३ ब – सुरेखा तायडे यांना पाठिंबा)
शेख अहमद नूर (प्रभाग १० ड – जाकीर खान पठाण यांना पाठिंबा)
नीलू संजय इंगळे (प्रभाग १० क – कविता शिवदे यांना पाठिंबा)
विजय पाटील (प्रभाग ८ क – अमर जैन यांना पाठिंबा)
मीनल हर्षल मावळे (प्रभाग १६ क – रंजना वानखेडे यांना पाठिंबा)
राज कोळी (प्रभाग ९ ड – डॉ. चंद्रशेखर पाटील यांना पाठिंबा)
या पाठिंब्यामुळे महायुतीची ताकद शहरात अधिक वाढली असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
प्रचाराचा श्रीगणेशा
मेळाव्यापूर्वी भवानी माता मंदिरात दर्शन घेऊन प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते महायुतीच्या प्रचाराचा अधिकृत प्रारंभ करण्यात आला. तसेच पिंप्राळा येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. मेळाव्यात गुलाबराव देवकर, किशोर पाटील आणि गिरीश महाजन यांनी आपल्या भाषणातून कार्यकर्त्यांमध्ये उत्साह भरला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशाल त्रिपाठी यांनी केले, तर आभार प्रदेश सरचिटणीस नितीन इंगळे यांनी मानले.








