जळगाव, (प्रतिनिधी) : पिंप्राळा परिसरातील प्रभाग क्रमांक ८ आणि १० मधील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उमेदवारांनी रविवारी शंकरराव नगर येथील कष्टभंजन हनुमान मंदिरात दर्शन घेऊन आपल्या प्रचाराचा अधिकृत शुभारंभ केला. यावेळी स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून “बदलासाठी मशाल” हाती घेण्याचा आणि शिवसेनेच्या सर्व ८ उमेदवारांना बहुमताने विजयी करण्याचा निर्धार व्यक्त केला.
हे आहेत प्रभागनिहाय उमेदवार:
या निवडणुकीत शिवसेना (उबाठा) गटाने प्रबळ उमेदवार मैदानात उतरवले आहेत:
उज्वला कुलभूषण पाटील (८-अ), शोभा रवींद्र सोनवणे (८-ब), मयूर चंद्रकांत कापसे (८-क), पुनमचंद सुपडू पाटील (८-ड). आणि कौशल्याबाई उत्तम निकम (१०-अ), पुष्पा विठ्ठल चौधरी (१०-ब), हसीनाबी शेख शरीफ (१०-क), कुलभूषण वीरभान पाटील (१०-ड)
प्रचाराच्या शुभारंभ प्रसंगी शिवसेनेचे संघटक गजानन मालपुरे यांनी महायुतीवर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, “ही लढाई हुकूमशाही आणि पैशांच्या जोरावर सत्ता गाजवू पाहणाऱ्यांविरुद्ध आहे. मतदारांनी अशा प्रवृत्तींना जागा दाखवून द्यावी आणि आपल्या हक्काचे, स्थानिक प्रश्न सोडवणारे प्रतिनिधी महापालिकेत पाठवावेत.”
नागरिकांचा बदलाचा सूर..
पिंप्राळा भागातील नागरिकांनी यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, “आता आम्हाला केवळ पोकळ आश्वासने देणारे नको, तर दिलेला शब्द पाळणारे लोकप्रतिनिधी हवे आहेत.” यावेळी माजी नगरसेवक चंद्रकांत कापसे, प्रतिभा कापसे, जिल्हाप्रमुख कुलभूषण पाटील यांच्यासह शेकडो कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते. कष्टभंजन हनुमानाचा जयघोष करत उमेदवारांनी घरोघरी जाऊन जनसंपर्क मोहिमेला सुरुवात केली आहे.








