जळगाव, (प्रतिनिधी) : शहरातील मास्टर कॉलनी परिसरात, शुक्रवार, ५ डिसेंबर रोजी उच्च दाबाच्या (हाय-व्होल्टेज) विजेच्या धक्क्याने एकाच कुटुंबातील बाप आणि मुलगी अशा दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे, तर १६ वर्षीय भाची गंभीर जखमी झाली आहे. महावितरणने परिसरातील धोकादायक विद्युत वाहिनी हटवण्याच्या मागणीकडे केलेल्या दुर्लक्षामुळे ही भीषण दुर्घटना घडल्याचा आरोप संतप्त नातेवाईकांनी केला आहे.
मास्टर कॉलनी येथे राहणारे मौलाना साबीर खान नवाझ खान (वय ३८) हे कुटुंबासह वास्तव्यास होते. शुक्रवारी सकाळी अंदाजे १०.३० वाजताच्या सुमारास त्यांची भाची मारिया फतेमाबी (वय १६) ही घराच्या गच्चीवर कपडे टाकण्यासाठी गेली होती. गच्चीजवळून गेलेल्या उच्च दाबाच्या विद्युत तारेचा तिला जोरदार धक्का बसला. भाचीला विजेचा धक्का बसलेला पाहून मौलाना साबीर खान यांची मोठी मुलगी आलिया (वय १२) तिला वाचवण्यासाठी पुढे झाली, मात्र तिलाही विजेचा जोरदार धक्का बसला. या दोघींनाही वाचवण्यासाठी मौलाना साबीर खान यांनी धाव घेतली, परंतु दुर्दैवाने त्यांनाही विजेचा जबरदस्त धक्का बसला आणि तिघेही गंभीर जखमी झाले.
बाप-लेकीचा जागीच मृत्यू..
या हृदयद्रावक घटनेत मौलाना साबीर खान (वय ३८) आणि त्यांची मोठी मुलगी आलिया (वय १२) यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्या निधनाने मास्टर कॉलनी परिसरात शोककळा पसरली आहे. गंभीर जखमी झालेली भाची मारिया फतेमाबी हिला तातडीने नजीकच्या सारा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे, तिची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. सुदैवाने मौलाना साबीर खान यांचा लहान मुलगा या दुर्घटनेतून थोडक्यात बचावला.
महावितरणच्या भोंगळ कारभारावर संताप..
या दुर्घटनेनंतर जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी नातेवाईकांनी महावितरण कंपनीच्या भोंगळ कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला. गेल्या काही महिन्यांपासून घराजवळून गेलेली ही उच्च दाबाची धोकादायक विद्युत वाहिनी हटवण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी वारंवार केली होती, परंतु महावितरणने या मागणीकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याने ही घटना घडल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.








