जळगाव, (प्रतिनिधी) : मध्यप्रदेशातील बऱ्हाणपूर शहरात रिक्षात प्रवाशांना बसवून त्यांचे खिसे कापून चोरी करणाऱ्या दोन अट्टल चोरट्यांना जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) बेड्या ठोकल्या आहेत. पकडलेले दोन्ही आरोपी हे जळगाव येथील रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. बऱ्हाणपूर येथील कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये रिक्षातील प्रवासी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदरचा गुन्हा जळगाव येथील रेकॉर्डवरील गुन्हेगार वसीम कय्युन खाटीक (रा. मास्टर कॉलनी, जळगाव) आणि तौसीफ सत्तार खान (रा. रामनगर, जळगाव) यांनी त्यांच्या साथीदारांसह केल्याची खात्रीशीर माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांना मिळाली.
वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी तात्काळ आपल्या अधिनस्त अधिकारी व अंमलदार यांना गुन्हा उघडकीस आणण्याचे आदेश दिले. त्यानुसार, पथकाने गोपनीय व गुप्त बातमीदारांमार्फत खात्रीशीर माहिती काढून रेकॉर्डवरील आरोपी १) वसीम कय्युन खाटीक (वय-३३) आणि २) तौसीफ सत्तार खान (वय-३६) यांना ताब्यात घेतले. या आरोपींना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता, त्यांनी सदरचा गुन्हा साथीदारांसोबत केल्याचे कबूल केले. पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली रिक्षासह आरोपींना पुढील कायदेशीर कारवाईसाठी बऱ्हाणपूर (मध्यप्रदेश) कोतवाली पोलीस स्टेशनच्या पथकाच्या ताब्यात दिले आहे.
सदरची उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी आणि अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वाखालील पथकाने पार पाडली. या पथकात पोलीस उपनिरीक्षक शरद बागल, पोलीस अंमलदार अतुल वंजारी, अकरम शेख, विजय पाटील, नितीन बाविस्कर, प्रविण भालेराव, किशोर पाटील, रविंद्र कापडणे, राहुल रगडे, नाना तायडे आणि महेश सोमवंशी यांचा समावेश होता.








