जळगाव, (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील १३३ ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना अखेर दीड वर्षानंतर आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मंजूर झाला असून, जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाने अत्यंत किचकट आणि तांत्रिक प्रक्रियेवर मात करून हे काम यशस्वीरीत्या पूर्ण केले आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे आणि प्रभावी समन्वयामुळे अनेक महिने प्रलंबित असलेला हा विषय मार्गी लागला आहे. संबंधित प्रस्तावांची तपासणी, पडताळणी आणि मंजुरीची प्रक्रिया पूर्ण करून पात्र अधिकाऱ्यांना लाभ वितरीत करण्यात आला आहे.
या कामी प्रभारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) अजय चौधरी, कनिष्ठ प्रशासन अधिकारी पी. आर. चौधरी तसेच ग्रामपंचायत विभागातील सर्व कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले. त्यांच्या काटेकोर नियोजन आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे जिल्ह्यातील ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना त्यांच्या पात्र हक्काचा लाभ अखेर मिळाला आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी सांगितले की, “अधिकाऱ्यांच्या सेवाभावी वृत्तीचा आणि प्रामाणिकपणाचा सन्मान म्हणून शासनाच्या सर्व योजना वेळेत व अचूक पद्धतीने अमलात आणणे हे आमचे ध्येय आहे. आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मिळाल्याने अधिकाऱ्यांचा उत्साह आणि प्रेरणा निश्चितच वाढेल.” या निर्णयामुळे जिल्ह्यातील ग्रामपंचायत अधिकाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून, त्यांनी जिल्हा प्रशासनाचे विशेष आभार मानले आहेत.










