जळगाव, (प्रतिनिधी) : जळगावची रंगभूमी अत्यंत सशक्त आहे. जळगावच्या नाट्यकलेला प्रोत्साहन देण्यासाठी तसेच छत्रपती संभाजी राजे नाट्यगृहातील अडचणी दूर करण्यासाठी आपण सदैव मदत करणार, अशी ग्वाही आमदार राजू मामा भोळे यांनी रंगभूमी दिनानिमित्त दिली. रंगभूमी दिनाचे औचित्य साधून कलावंतांच्या वतीने संभाजी राजे नाट्यगृहात रंगमंच पूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी आ. भोळे बोलत होते. त्यांनी जळगावच्या कलावंतांच्या कार्याला शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाची सुरुवात गायक दुष्यंत जोशी यांच्या नांदीने झाली. नाट्य, संगीत, चित्रकला आणि साहित्य अशा विविध क्षेत्रांतील कलावंत यावेळी उपस्थित होते. या सर्वांच्या उपस्थितीत विधिवत रंगभूमीचे पूजन करण्यात आले.
यावेळी ज्येष्ठ रंगकर्मी चिंतामण पाटील, शंभू पाटील, पुरुषोत्तम चौधरी, विजय पाठक, मंजुषा भिडे, होरीलसिंग राजपूत, पियुष रावळ, नारायण बाविस्कर, विनोद पाटील, योगेश शुक्ल, अनिल मोरे, संजय निकुंभ, अंजली पाटील, जयश्री पाटील, राजू बाविस्कर, हेमंत भिडे, बी. के. पाटील, मंगेश कुलकर्णी, नेहा पवार, श्री सुरपूर, सागर येवले, तेजस पाठक आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिनेता हर्षल पाटील यांनी केले.










