जळगाव, (प्रतिनिधी) : शहरातील एमआयडीसी परिसरात कंपनी कामगाराचा खून करून फरार झालेल्या अट्टल आरोपी पती-पत्नीला एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने केवळ २४ तासांत नांदुरा (जि. बुलढाणा) येथून मोठ्या शिताफीने जेरबंद केले आहे.
एमआयडीसी परिसरात किरकोळ भांडणाच्या कारणावरून अवैध अग्निशस्त्राचा वापर करून एका कंपनी कामगार तरुणाचा खून करण्यात आला होता. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल होताच, पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांनी आरोपींच्या शोधार्थ त्वरित गुन्हे शोध पथकाची नियुक्ती केली.
खुनाच्या घटनेनंतर मुख्य आरोपी राहुल रामचंद्र बऱ्हाटे आणि त्याची पत्नी मोनाली राहुल बऱ्हाटे (रा. रामेश्वर कॉलनी, जळगाव) हे दोघेही पसार झाले होते. आरोपी वारंवार आपले ठिकाण बदलत असल्याने पोलिसांना त्यांचा शोध घेताना अडचणी येत होत्या. मात्र, मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे एमआयडीसी गुन्हे शोध पथकाने तांत्रिक तपास आणि पाठलाग करून, हे आरोपी मोटारसायकलवरून पसार होत असताना त्यांना नांदुरा (जि. बुलढाणा) येथील महामार्गावर शिताफीने ताब्यात घेतले.
पोलीस पथकाने आरोपी पती-पत्नीला विश्वासात घेऊन चौकशी केली असता, त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यानंतर त्यांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना अटक करण्यात आली आहे. दि.०४ नोव्हेंबर ला आरोपींना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना ०७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक बबन आव्हाड हे करत आहेत.
पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे आणि पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली हे गुन्हे शोध पथक कार्यरत होते. या पथकात पोउनि राहुल तायडे, पोउनि चंद्रकांत धनके, सफौ विजयसिंग पाटील, पोह प्रदीप चौधरी, गणेश शिरसाळे, प्रमोद लाडवंजारी, किरण चौधरी, गिरीश पाटील, पोकों नितीन ठाकुर, गणेश ठाकरे, किरण पाटील आणि शशिकांत मराठे यांचा समावेश होता.










