जळगाव, (प्रतिनिधी) : अखिल भारतीय मराठी शाहीर परिषद आणि खान्देश लोककलावंत विकास प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने जळगाव येथे आयोजित मराठी शाहीर लोककला संमेलनात ज्येष्ठ शाहीर व अखिल भारतीय मराठी शाहीर परिषदेचे संस्थापक, विश्वस्त रमेश कदम यांना पहिला ‘खान्देश रत्न राष्ट्रशाहीर सिद्राम बसाप्पा मुचाटे जीवन गौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. ५१ हजार रुपये, शाल, श्रीफळ व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
या समारंभात शाहीरी डफाच्या गजरात खान्देशातील लोककलांचा जागर करण्यात आला. स्मितोदय फाऊंडेशनच्या अध्यक्षा भैरवी पंलाडे-वाघ यांच्या हस्ते, आमदार राजू मामा भोळे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध शाहीर व परिषदेचे नवनिर्वाचित कार्याध्यक्ष डॉ. शाहीर देवानंद माळी होते, तर प्रास्ताविक आयोजक शाहीर विनोद ढगे यांनी केले.
पुरस्कार स्वीकारताना शाहीर रमेश कदम यांनी परिषदेच्या ३५ वर्षांच्या कार्याचा आढावा घेतला आणि परिषदेची धुरा आता युवा नेतृत्वाकडे सोपवण्याची वेळ आल्याचे नमूद केले. तत्पूर्वी, लोककला शोभायात्रा काढण्यात आली. यात खान्देशातील शाहीर, वही गायन, वाघ्या मुरळी, गोंधळी, टिंगरी वादक अशा विविध लोककला प्रकारांतील कलावंतांनी सहभाग घेतला. यावेळी राज्यभरातील अनेक शाहीर परिषदेचे पदाधिकारी व लोककलावंत मोठ्या संख्येने उपस्थित होते.










