जळगाव, (प्रतिनिधी) : शहर पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने मोठी कामगिरी करत श्रीराम रथोत्सवाच्या कार्यक्रमात महिलांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र चोरणाऱ्या अट्टल महिला गुन्हेगारांच्या टोळीला जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून चोरीचा ऐवजही हस्तगत करण्यात आला असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दि. २ नोव्हेंबर रोजी दाणाबाजार परिसरातील अन्नदाता हनुमान मंदिराच्या जवळ श्रीराम रथ आल्याने दर्शनासाठी महिला व पुरुषांची मोठी गर्दी जमली होती. सायंकाळी ६ ते ८ वाजेच्या दरम्यान, याच गर्दीचा फायदा घेऊन काही महिला आरोपींनी दर्शनासाठी आलेल्या महिलांच्या गळ्यातील सुमारे ७७ हजार ५०० रुपये किमतीच्या सोन्याच्या मंगळसूत्रातील वाट्या व मणी तोडून चोरी केली होती. या चोरीची तक्रार जळगाव शहर पोलिस ठाण्यात दाखल झाली होती.
पोलिसांची तत्परता आणि यशस्वी कारवाई
चोरीची तक्रार येताच, उपविभागीय पोलिस अधिकारी नितीन गणापुरे व पोलिस निरीक्षक सागर शिंपी यांच्या सूचनेनुसार गुन्हे शोध पथकाने तत्काळ कारवाईला सुरुवात केली. या पथकांनी तातडीने तपासचक्रे फिरवून संशयित महिलांना ताब्यात घेतले आणि त्यांची संपूर्ण टोळी जेरबंद केली. पोलिसांच्या या कारवाईमुळे रथोत्सवातील महिलांच्या सुरक्षेला आव्हान देणाऱ्या या ‘लेडीज गँग’चा पर्दाफाश झाला आहे. या टोळीवर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.










