जळगाव (प्रतिनिधी) : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील केंद्र व राज्य सरकारच्या विविध विकास योजनांची माहिती जळगाव जिल्ह्यातील नागरिकांना मिळावी, यासाठी सोमवार, दि.३ ते बुधवार, ५ नोव्हेंबर दरम्यान जळगावच्या शिवतीर्थ – जीएस ग्राऊंडवर भव्य ‘प्रगतीशिल महाराष्ट्र २०२५’ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. दिल्ली येथील फ्रेंड्ज एक्झिबिशन अँड प्रमोशन संस्थेने आयोजित केलेले हे प्रदर्शन ‘एक उन्नत राष्ट्र की और..’ या घोषवाक्यासह, तीनही दिवस सकाळी १०.३० ते सायंकाळी ५ पर्यंत सर्वांसाठी खुले राहणार आहे. या आगळ्यावेगळ्या प्रदर्शनाला जळगावकरांनी भेट द्यावी, असे आवाहन खासदार स्मिता वाघ व आमदार राजूमामा भोळे व अखिला श्रीनिवासन यांनी केले आहे.
प्रदर्शनाचे उद्घाटन दि. ३ नोव्हेंबर रोजी ११ वाजता जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील, केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, मंत्री संजयजी सावकारे व जिल्ह्यातील आमदार उपस्थित राहतील.
खासदार स्मिता वाघ यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली की, या प्रदर्शनात केंद्र आणि राज्यातील कृषी, ग्रामीण विकास, विज्ञान आणि तंत्रज्ञान, पर्यावरण, आयुष, आरोग्य, महाऊर्जा, प्रदूषण नियंत्रण मंडळ, आधार, जळगाव महापालिका व जिल्हा परिषद, कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ-इनक्युबेशन सेंटरसह विविध विभागांच्या जनकल्याणकारी योजनांचे स्टॉल्स असणार आहेत. या पत्रकार परिषदेला दिपक सूर्यवंशी, डॉ. राधेश्याम चौधरी, दिपक परदेशी, मनोज भांडारकर व अखिला श्रीनिवासन, आनंद पाल, दीपकसिंग मेहता, साक्षी सैनी आदी उपस्थित होते.
शालेय विद्यार्थ्यांसाठी संधी:
या प्रदर्शनानिमित्त जळगाव जिल्ह्यातील शाळा आणि महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांसाठी शोध प्रकल्प स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. यात विजेत्यांना स्मृतीचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.










