यावल, (प्रतिनिधी) : येथील ६० वर्षीय वकिलाला ऑनलाइन ट्रेडिंगमध्ये (Online Trading) गुंतवणुकीचे मोठे आमिष दाखवून तब्बल एक लाख दहा हजार रुपयांना गंडा घालण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी यावल पोलिस ठाण्यात एका महिलेविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यावल येथील पंचवटी भागातील गांधी चौकात राहणारे ॲड. राजेश प्रभाकर गडे (६०) यांना २७ जुलै २०२५ रोजी ‘अंकिता शर्मा’ असे नाव सांगणाऱ्या एका महिलेने संपर्क साधला. या महिलेने ॲड. गडे यांना ऑनलाइन ट्रेडिंग प्लॅटफॉर्मवर गुंतवणूक केल्यास अल्पावधीत जास्त परतावा मिळेल, असे सांगून त्यांच्याशी विश्वास संपादन केला.
महिलेने दिलेल्या सूचनांवर विश्वास ठेवून ॲड. गडे यांनी विविध वेळी एकूण १ लाख १० हजार रुपये ऑनलाइन ट्रान्सफर केले. मात्र, पैसे ट्रान्सफर झाल्यानंतर जेव्हा ॲड. गडे यांनी पुन्हा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, तेव्हा संबंधित महिला (अंकिता शर्मा) आणि तिने सांगितलेला ट्रेडिंग प्लॅटफॉर्म दोघेही गायब झाले.
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच ॲड. राजेश गडे यांनी तात्काळ यावल पोलिस ठाण्यात धाव घेतली आणि घडलेल्या प्रकाराबद्दल सविस्तर तक्रार नोंदवली. या तक्रारीनुसार, यावल पोलिसांनी अज्ञात महिलेविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे. दरम्यान नागरिकांनी अशा प्रकारच्या ऑनलाइन फसवणुकीच्या आमिषांपासून सावध राहावे, असे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे.










