जळगाव, (प्रतिनिधी) : भारत सरकारच्या अणुऊर्जा विभाग आणि भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) यांच्या संयुक्त विद्यमाने, २५ ऑक्टोबर २०२५ ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत हैदराबाद येथून सुमारे १० उच्च उंचीवरील वैज्ञानिक बलून उड्डाणे करण्यात येणार आहेत. ही महत्त्वाकांक्षी उड्डाणे टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च (TIFR), ईसीआयएल, हैदराबाद येथील बलून सुविधा केंद्रातून केली जातील.
जळगावसह महाराष्ट्रातील १३ जिल्ह्यांत ‘लँडिंग’ची शक्यता..
१९५९ सालापासून महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने होणाऱ्या या प्रयोगांमध्ये, बलून हायड्रोजन वायूने भरलेले असून त्यांचा व्यास ५० ते ८५ मीटर इतका असतो. ही बलून ३० ते ४२ किलोमीटर उंचीवर मौल्यवान वैज्ञानिक उपकरणे वाहून नेतात. काही तासांच्या प्रयोगानंतर, ही उपकरणे रंगीत पॅराशूटच्या सहाय्याने जमिनीवर उतरतात. वाऱ्याच्या दिशेनुसार, ही उपकरणे हैदराबादपासून २०० ते ३५० किलोमीटर अंतरावर पडू शकतात. त्यामुळे महाराष्ट्रातील औरंगाबाद, बीड, नांदेड, परभणी, सांगली, सातारा, अहमदनगर, नागपूर, जळगाव, सोलापूर, चंद्रपूर, वर्धा आणि गडचिरोली या १३ जिल्ह्यांत ही उपकरणे उतरण्याची दाट शक्यता आहे.
नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन..
TIFR ने नागरिकांना विशेष विनंती केली आहे की:
▪️अशा वस्तू आढळल्यास त्या उघडू किंवा हलवू नयेत.
▪️उपकरणांशी छेडछाड केल्यास मौल्यवान वैज्ञानिक माहिती नष्ट होऊ शकते.
▪️काही उपकरणांवर उच्च विद्युत दाब (हाय व्होल्टेज) असू शकतो, त्यामुळे त्यांना हाताळू नये.
अशा वस्तू आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलिस ठाणे, पोस्ट ऑफिस किंवा जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधावा.
पुरस्कार आणि सन्मान..
उपकरणांची सुरक्षित परतफेड करणाऱ्या नागरिकांना योग्य बक्षीस आणि झालेला खर्च परत दिला जाईल. मात्र, उपकरणांशी छेडछाड झाल्यास बक्षीस दिले जाणार नाही. स्थानिक प्रशासनाने ही माहिती गावपातळीपर्यंत पोहोचवून स्थानिक भाषेत जनजागृती करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. पहिले बलून उड्डाण ऑक्टोबरच्या चौथ्या आठवड्यात होणार असून, सर्व आवश्यक तयारी तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.










