जळगाव, (प्रतिनिधी) : शहरातील शिवराम नगरमध्ये असलेल्या आमदार एकनाथराव खडसे यांच्या बंगल्यात मध्यरात्री चोरट्यांनी चोरी केली आहे. दिवाळीनिमित्त आमदार खडसे हे त्यांच्या मूळ गावी कोथळी येथे असताना ही घटना घडली. प्राथमिक माहितीनुसार, सुमारे ८ ते ९ तोळे सोने आणि ३५ हजार रुपये रोख रक्कम चोरीला गेली असल्याचा प्रकार समोर आला आहे.
मंगळवारी, २८ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजता घराची राखण करणारा कर्मचारी बंगल्यावर आला असता त्याला मुख्य गेटचे कुलूप तुटलेले दिसले. त्याने तातडीने आ. खडसे आणि कार्यकर्ते अशोक लाडवंजारी यांना ही माहिती दिली. लाडवंजारी यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली असता घरातून सोने आणि रोख रक्कम चोरीला गेल्याचे स्पष्ट झाले.
या घटनेची माहिती मिळताच रामानंदनगर पोलीस स्टेशन, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्यासह पोलीस दल तातडीने घटनास्थळी दाखल झाले. उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे, एलसीबीचे निरीक्षक राहुल गायकवाड आणि कर्मचाऱ्यांनी परिसराची पाहणी केली. तपासासाठी श्वान पथक आणि ठसे तज्ज्ञ यांना पाचारण करण्यात आले. श्वानाने घरापासून काही अंतरावर मार्ग दाखवला, मात्र तो तेथेच घुटमळला. तसेच, पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू केली असून, फॉरेन्सिक पथकालाही बोलवण्यात आले आहे.
कार्यकर्त्यांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, आमदार खडसे यांच्या चार अंगठ्या आणि त्यांच्या घरातील कर्मचारी गोपाल सरोदे यांचे ६ ते ७ तोळ्यांचे सोने असा ऐवज चोरीस गेला आहे. माजी मंत्र्याच्या घरी चोरी झाल्याने कार्यकर्ते अशोक लाडवंजारी आणि सुनील माळी यांनी माध्यमांशी बोलताना जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था शिल्लक आहे की नाही, असा संतप्त सवाल उपस्थित केला आहे.










