जळगाव, (प्रतिनिधी) : दिवाळीच्या शुभपर्वाच्या पार्श्वभूमीवर, जळगाव जिल्हा पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक यांनी नागरिकांना सुरक्षित आणि आनंदमय वातावरणात सण साजरा करण्यासाठी महत्त्वपूर्ण सूचनांचे जाहीर आवाहन केले आहे. चोरी, घरफोडी, ऑनलाइन फसवणूक तसेच फटाक्यांमुळे होणारे अपघात टाळण्यासाठी नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
फटाक्यांबाबत ‘ही’ खबरदारी घ्या:
▪️फटाके केवळ परवानाधारक विक्रेत्यांकडूनच खरेदी करावेत आणि ते मोकळ्या व सुरक्षित ठिकाणीच फोडावेत.
▪️ लहान मुलांनी फटाके फोडताना पालकांनी त्यांच्यावर देखरेख ठेवावी.
▪️अपघात टाळण्यासाठी फटाके फोडताना सुती कपडे परिधान करावेत.
▪️रुग्णालय आणि शाळांसारख्या शांतता क्षेत्रात फटाके फोडणे पूर्णपणे टाळावे.
चोरी व घरफोडी टाळण्यासाठी उपाययोजना:
▪️बाहेरगावी जात असाल तर शेजाऱ्यांना व जवळच्या पोलीस स्टेशनला नक्की माहिती द्यावी.
▪️बाजारपेठेत पाकीट, मोबाईल व मौल्यवान वस्तूंची विशेष काळजी घ्यावी आणि अनोळखी व्यक्तींपासून सावध राहावे.
▪️महिलांनी मौल्यवान दागिने परिधान करून एकट्याने फिरणे टाळावे; दागिने झाकले जातील याची काळजी घ्यावी.
▪️चेहरा लपवलेल्या किंवा नंबर प्लेट नसलेल्या संशयास्पद दुचाकीस्वारांपासून सावध राहावे.
▪️घर सोडताना दरवाजे-खिडक्या व्यवस्थित बंद करून मजबूत कुलूप लावावे.
▪️अनोळखी फेरीवाले किंवा मदतनीस यांना माहिती घेतल्याशिवाय घरात प्रवेश देऊ नये.
▪️शक्य असल्यास घराच्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत आणि ते कार्यान्वित असल्याची खात्री करावी.
ऑनलाइन फसवणूक टाळण्यासाठी:
▪️’मोफत बक्षीस’ किंवा ‘मोठ्या सवलती’च्या बनावट लिंक्सवर क्लिक करणे टाळावे.
▪️बँक ओटीपी, सीव्हीव्ही किंवा पिन क्रमांक कोणाशीही शेअर करू नये.
वाहतुकीच्या नियमांचे पालन:
▪️वाहने केवळ पार्किंगच्या ठिकाणीच लावावीत.
▪️मद्यपान करून वाहन चालवणे पूर्णपणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी:
पोलीस नियंत्रण कक्ष (११२), अग्निशमन दल (१०१) आणि रुग्णवाहिका (१०८) हे महत्त्वाचे संपर्क क्रमांक नागरिकांनी नोंदवून घ्यावेत. जळगाव जिल्हा पोलीस दलाने नागरिकांना जबाबदारीने आणि सुरक्षितपणे दिवाळीचा सण साजरा करण्याचे आवाहन केले आहे.