जळगाव, (प्रतिनिधी) : घरात कोणीही नसल्याची संधी साधत दिराने भावजयीवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार जळगावात समोर आला आहे. याविषयी विवाहितेने पती व सासूला सांगितले असता, त्यांनी ‘हा प्रकार कोणाला सांगू नको, नाहीतर आयुष्य उद्ध्वस्त करू’ अशी धमकी दिली. गेल्या वर्षापासून हा प्रकार सुरू असताना १० ऑक्टोबर रोजी पुन्हा दिराने तिचा विनयभंग केला. याप्रकरणी त्रस्त झालेल्या विवाहितेच्या फिर्यादीवरून दिरासह पती आणि सासूविरुद्ध रामानंद नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रामानंद नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका भागात राहणारी विवाहिता ऑगस्ट २०२४ मध्ये घरी एकटीच असताना तिच्या दिराने तिच्यावर अत्याचार केला. पीडित विवाहितेने तातडीने हा प्रकार पती व सासूला सांगितला. मात्र, त्यांनी तिला मदत करण्याऐवजी उलट ‘अशा गोष्टी मला सांगायच्या नाहीत, तुला राहायचं असेल तर राहा नाही तर निघून जा’ असे सुनावले. यासोबतच कोणालाही काही सांगितल्यास तुझे आयुष्य उद्ध्वस्त करून टाकू, अशी धमकीही दिली.
पती आणि सासूच्या धमकीमुळे विवाहिता वर्षभर हा अत्याचार सहन करत राहिली. सततच्या या प्रकाराने कंटाळलेल्या या विवाहितेला १० ऑक्टोबर रोजी पुन्हा दिराने अश्लील कृत्य करीत तिचा विनयभंग केला. त्यानंतर मात्र तिने न डगमगता दि. १० ऑक्टोबर रोजी रामानंद नगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिरासह अत्याचार लपवून धमकी देणारे पती आणि सासू अशा तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.