जळगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील शिरसोली येथील रहिवासी असलेल्या एका विवाहितेने पंख्याला ओढणीने गळफास लावून आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना गुरुवार, दि.९ ऑक्टोबर रोजी रात्री साडे आठ ते नऊ वाजेच्या दरम्यान उघडकीस आली आहे. ही घटना घडली तेव्हा, विवाहितेचे सासू-सासरे हे पुढील खोलीत होते. या घटनेने शिरसोली गावावर शोककळा पसरली आहे.
प्रियंका श्रीकांत बारी (वय २६, रा. शिरसोली ता. जळगाव) असे मयत विवाहितेचे नाव आहे. तिच्या पश्चात आई, वडील, पती, दोन मुले, सासू-सासरे असा परिवार आहे. प्रियंकाचे पती श्रीकांत हे हॉटेल चालक असून ग्रामपंचायतमध्ये कॅम्पुटर ऑपरेटर म्हणून काम करतात. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री प्रियंकाचे सासू-सासरे हॉलमध्ये बसलेले असताना प्रियंका आतल्या खोलीत होती. काही वेळाने कुटुंबीय तिच्या खोलीत गेले असता, तिने पंख्याला ओढणीने गळफास लावलेला दिसून आला.
यावेळी कुटुंबीयांनी एकच हंबरडा फोडला. ग्रामस्थांच्या मदतीने प्रियंका बारी हिला तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून तिला मयत घोषित केले. रुग्णालयात कुटुंबीयांनी मन हेलावणारा आक्रोश केला.
दरम्यान, प्रियंकाने आत्महत्या का केली, याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. तिचे माहेर छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील सोयगाव येथे आहे. या घटनेप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते. विशेष म्हणजे, मागील महिन्यातही शिरसोली गावात एका विवाहितने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली होती. या नवीन घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.