जळगाव, (प्रतिनिधी) : जिल्ह्यात गंभीर गुन्ह्यांना प्रतिबंध घालण्याच्या दृष्टीने, पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या आदेशानुसार, जळगाव जिल्हा पोलीस दलाने १६ ते ३० सप्टेंबर या कालावधीत अवैध अग्नीशस्त्रांविरुद्ध विशेष मोहीम यशस्वीपणे राबवली.
या मोहिमेत स्थानिक गुन्हे शाखा आणि विविध पोलीस स्टेशनच्या पथकांनी संयुक्तरीत्या कारवाई करत एकूण १० देशी बनावटीचे अग्नीशस्त्रे आणि २४ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. या कारवाईत एकूण १२ आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याविरुद्ध ‘आर्म्स ॲक्ट’ अंतर्गत विविध पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलीस स्टेशननिहाय कारवाईचा तपशील
जप्त करण्यात आलेल्या शस्त्रांमध्ये देशी बनावटीच्या पिस्तुलांचा समावेश असून, काही आरोपींवर यापूर्वीही गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याचे पोलीस अभिलेखावरून स्पष्ट झाले आहे. ही विशेष मोहीम पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, अपर पोलीस अधीक्षक, चाळीसगांव कविता नेरकर आणि सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा आणि संबंधित पोलीस स्टेशनच्या अधिकारी व अंमलदार यांनी संयुक्तपणे यशस्वी केली. जळगाव जिल्ह्यात अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांविरुद्ध यापुढेही कठोर कारवाई सुरूच राहील, असा इशारा जिल्हा पोलिसांनी दिला आहे.