जळगाव, (प्रतिनिधी) : शहरातील गेंदालाल मिल परिसरात राहणाऱ्या एका तरुणाचा धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना रविवार, ५ ऑक्टोबर रोजी रात्री १० ते ११ वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे. हा खून भुसावळ तालुक्यातील कंडारी गावात झाला असून, याप्रकरणी भुसावळ शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते. जितेंद्र राजेंद्र साळुंखे (वय ४०, रा. गेंदालाल मिल, जळगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जितेंद्र साळुंखे हा जळगाव शहरातील तिघांसोबत भुसावळ तालुक्यातील कंडारी येथे एका कामानिमित्त गेला होता. कंडारी गावातील एका हॉटेलवर चौघांनी एकत्र मद्यपान केले. याच वेळी त्यांच्यात किरकोळ वाद सुरू झाले आणि या वादाचे पर्यावसन हाणामारीत झाले. या हाणामारीदरम्यान, इतर तिघांनी धारदार शस्त्राने वार करून जितेंद्र कोळी याला जागीच संपवले. गंभीर जखमी झालेल्या जितेंद्रला तातडीने खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्याला मयत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी व रुग्णालयात धाव घेतली.
रात्री उशिरापर्यंत फिर्याद दाखल करण्याचे काम सुरू होते. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित, बाजारपेठचे पोलीस निरीक्षक राहुल वाघ, पीएसआय इकबाल सय्यद यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेची टीम पोहोचली होती. संशयित आरोपींचा माग काढण्याचे काम सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे.