जळगाव, (प्रतिनिधी) : ममुराबाद रोडवरील एल के. फॉर्म येथे ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या एका आंतरराज्यीय बोगस कॉल सेंटरचा पर्दाफाश झाला आहे. अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्या विशेष पथकाने आज २८ सप्टेंबर रोजी दुपारी छापा टाकून ही धडक कारवाई केली.
या कारवाईत कॉल सेंटरचा मालकासह एकूण आठ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. हे आरोपी स्वतःला ‘अधिकृत एजंट’ भासवून वेगवेगळ्या आमिषांनी परदेशी नागरिकांची फसवणूक करत होते. पोलिसांनी घटनास्थळावरून ३१ लॅपटॉपसह संपूर्ण कॉल सेंटरचा सेट-अप जप्त केला आहे. ताब्यात घेण्यात आलेले बहुतांश आरोपी राज्याबाहेरील असल्याने या टोळीचा आंतरराज्यीय स्तरावर फैलाव असण्याची शक्यता आहे. दरम्यान फॉर्मचे लोकल मालक ललित कोल्हे यांना देखील चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.
या फसवणूक रॅकेटच्या जाळ्याचा आणि जप्त केलेल्या डेटाच्या आधारावर पोलीस आता सखोल चौकशी करत आहेत. अपर पोलीस अधीक्षक नखाते यांच्या या कामगिरीमुळे जळगावातील एका मोठ्या ऑनलाईन फसवणूक टोळीचा भांडाफोड झाला आहे.