जळगाव, (प्रतिनिधी) : श्री महावीर सहकारी बँक लि. ची २७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा रोटरी भवन येथे नुकतीच उत्साहात पार पडली. या सभेत भागधारक, ठेवीदार आणि संचालक मंडळाच्या वतीने जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. चे अध्यक्ष अशोक जैन यांचा मानपत्र देऊन विशेष गौरव करण्यात आला.
मुंबई येथील चक्र व्हिजन इंडिया फाऊंडेशनच्या ‘विवेकानंद इंटरनॅशनल रिलेशन्स पीस अवार्ड’ ने नुकताच सन्मानित झाल्याबद्दल जळगावचे भूमिपुत्र असलेल्या अशोक जैन यांचा बँकेने विशेष सन्मान केला. गतवर्षी हा जीवन गौरव पुरस्कार टाटा समूहाचे अध्यक्ष रतन टाटा यांना प्रदान करण्यात आला होता.
माजी मंत्री सुरेशदादा जैन, बँकेचे चेअरमन दलिचंद जैन, माजी संचालक राजेंद्र मयूर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सत्कार सोहळा पार पडला. यावेळी व्यासपीठावर व्हा. चेअरमन जयवंतराव देशमुख यांच्यासह संचालक मंडळाचे सदस्य उपस्थित होते.
दलिचंद जैन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत लाभांश मंजुरी, संचालक मंडळाचा अहवाल, लेखापरिक्षीत ताळेबंद आणि नफा-तोटा पत्रक अशा १३ विषयांवर चर्चा होऊन ते मंजूर करण्यात आले. अध्यक्षांनी यावेळी कन्या जन्मोत्सव योजनेतून मिळणाऱ्या निधीत दुप्पट वाढ करण्याची घोषणा केली.
माजी मंत्री सुरेशदादा जैन यांनी मनोगत व्यक्त करताना बँकेच्या स्थापनेतील भवरलाल जैन आणि इतरांच्या योगदानाचा गौरव केला आणि अशोक जैन यांचे शेतकऱ्यांच्या जीवनातील परिवर्तन आणि सामाजिक कार्याचे कौतुक केले. याप्रसंगी, बँकेच्या सभासदांच्या १० वी, १२ वी तसेच पदवीमध्ये विशेष प्रावीण्य मिळवलेल्या गुणवंत पाल्यांचा देखील गौरव करण्यात आला. अजय राखेचा यांनी मानपत्राचे वाचन व सूत्रसंचालन केले, तर सुभाष लोढा यांनी आभार मानले. राष्ट्रगीताने सभेचा समारोप झाला.