जळगाव, (प्रतिनिधी) : रामानंद नगर पोलिसांनी एका मोठ्या घरफोडीच्या गुन्ह्याचा छडा लावत, ३१ तोळे (३१० ग्रॅम) सोने आणि २५० ग्रॅम चांदी असा मौल्यवान ऐवज हस्तगत केला आहे. या कारवाईत पोलिसांनी चार आरोपींना अटक केली असून, दोन घरफोडी आणि एक दुचाकी चोरी असे एकूण तीन गुन्हे उघडकीस आणले आहेत.
काय आहे प्रकरण?
रामानंद नगर पोलीस स्टेशनमध्ये दि.०१/०६/२०२५ रोजी फिर्यादी लीलाधर शांताराम खंबायत यांनी तक्रार दाखल केली होती. त्यांचे साडू परदेशात गेले असल्याने दि.१५/०५/२०२५ ते दि. ०१/०६/२०२५ या कालावधीत त्यांच्या न्यू पार्वतीबाई काळे नगर, मोहाडी रोड येथील बंद घराचा कडी-कोयंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी आत प्रवेश केला. या घरफोडीत चोरट्यांनी सुमारे ३५७ ग्रॅम वजनाचे सोने, २५० ग्रॅम चांदीचे दागिने आणि ₹८५,००० रोख रक्कम तसेच एक डीव्हीआर (DVR) असा एकूण ₹३६,८३,०००/- किमतीचा मुद्देमाल लंपास केला होता. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलिसांनी कसा लावला छडा?
जळगावचे पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि SDPO नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांच्या नेतृत्वाखालील पथकाने या गुन्ह्याचा तपास सुरू केला. तपासादरम्यान, सपोनि भूषण कोते, पोशि अनिल सोननी आणि नितेश बच्छाव हे रात्रीच्या गस्तीवर असताना, त्यांना दोन संशयित इसम फिरताना आढळले. पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून त्यांना पकडले. कसून चौकशी केली असता त्यांनी मोहाडी रोडवरील घरफोडीची कबुली दिली.
अटक आणि गुन्हे उघड..
या प्रकरणी पोलिसांनी रवि प्रकाश चव्हाण (वय २१) आणि शेख शकील शेख रफिक (वय ३९) यांना दि. १९ सप्टेंबर ला अटक केली. त्यांच्या माहितीवरून त्यांचे साथीदार जुनेद उर्फ मुस्तकीम भिकन शहा आणि गुरुदयालसिंग मनजित टाक यांना २०सप्टेंबर ला अटक करण्यात आली. अटक केलेल्या आरोपींकडून एकूण ०२ घरफोडी आणि ०१ दुचाकी चोरीचा गुन्हा उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले.
३४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत..
चोरलेल्या मालाची विक्री त्यांनी सुरत आणि जामनेर येथे केल्याचे समोर आले. पोलिसांनी त्वरित कारवाई करत सुरत आणि जामनेर येथून सुमारे ₹३३,७९,०००/- किमतीची ३१० ग्रॅम सोन्याची लगड (बिस्किट) आणि ₹२५,०००/- किमतीची २५० ग्रॅम चांदीची लगड हस्तगत केली. तसेच, चोरीस गेलेली ₹४५,०००/- किमतीची एमएच-१९-बी डब्लू-९१४४ क्रमांकाची ऍक्टिवा दुचाकी देखील जप्त करण्यात आली. एकूण ₹३४,४९,०००/- किमतीचा मुद्देमाल जप्त करत, रामानंद नगर पोलिसांनी या मोठ्या गुन्ह्याची उकल केली आहे.
पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि भूषण कोते, पोहेकॉ जितेंद्र राजपूत, जितेंद्र राठोड, सुशील चौधरी, सुधाकर अंभोरे, पोना. योगेश बारी, विनोद सूर्यवंशी, अतुल चौधरी, रेवानंद साळुंखे, हेमंत कळसकर, पोशि अनिल सोननी, नितेश बच्छाव, गोविंदा पाटील, दीपक वंजारी आणि चालक पोहेकॉ प्रमोद पाटील यांनी या कारवाईत सहभाग घेऊन उत्कृष्ट कामगिरी केली.