जळगाव (प्रतिनिधी) : ‘बालरंगभूमी परिषदे’तर्फे आयोजित ‘इतिहास महाराष्ट्राचा – श्री शिवजन्मोत्सव ते श्री शिवराज्याभिषेक’ या राज्यव्यापी उपक्रमाची महाअंतिम फेरी नुकतीच मुंबईतील यशवंतराव चव्हाण नाट्यसंकुल येथे पार पडली. या स्पर्धेत जळगावच्या गुरुवर्य परशुराम विठोबा प्राथमिक विद्यालयाने आणि विद्यार्थिनी वैभवी बगाडेने चमकदार कामगिरी करत आपले वर्चस्व सिद्ध केले.
राज्यभरात २६ ठिकाणी झालेल्या प्राथमिक फेरीतून निवडलेल्या सात हजारांहून अधिक बालकलावंतांमधून, जळगावच्या संघाने महाअंतिम फेरीत समूह गटात ‘विशेष लक्षवेधी पुरस्कार’ पटकावला. त्यांनी सादर केलेल्या पोवाड्याने परीक्षकांची आणि उपस्थितांची मने जिंकली. त्याचप्रमाणे, एकल सादरीकरणात वैभवी बगाडेलाही ‘विशेष लक्षवेधी पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. तिच्या पोवाड्याच्या सादरीकरणाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या स्पर्धेचे परीक्षण सुप्रसिद्ध लोकशाहीर नंदेश उमप, अभिनेते सुनील गोडसे आणि शिवशाहीर प्रवीण जाधव यांनी केले.
विजेत्यांना बालरंगभूमी परिषदेच्या अध्यक्ष ॲड. नीलम शिर्के सामंत यांच्यासह कार्याध्यक्ष राजू तुलालवार, उपाध्यक्ष ॲड.शैलेश गोजमगुंडे, डॉ.दीपा क्षीरसागर, प्रभारी प्रमुख कार्यवाह योगेश शुक्ल, कोषाध्यक्ष नंदकिशोर जुवेकर, सहकार्यवाह दिपाली शेळके, आसिफ अन्सारी, कार्यकारिणी सदस्य त्र्यंबक वडसकर, नागसेन पेंढारकर, वैदेही चवरे सोईतकर, अनंत जोशी, सीमा यलगुलवार, सुजय भालेराव, शिवाजी शिंदे, वैभव जोशी आदींच्या हस्ते पारितोषिक प्रदान करण्यात आले.
जळगावच्या बालकलावंतांच्या या यशाबद्दल बालरंगभूमी परिषद, जळगाव जिल्हा शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले. या कामगिरीने जळगावचे नाव महाराष्ट्राच्या सांस्कृतिक नकाशावर अधिक ठळक झाले आहे.