जळगाव, (प्रतिनिधी) : मुक्ताईनगर तालुक्यात मंगळवारी सकाळी झालेल्या ढगफुटीसदृश्य पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. सकाळी ७ ते १० या तीन तासांच्या मुसळधार पावसामुळे गोरक्षगंगा नदीकाठच्या सुमारे १५ गावांना पुराचा मोठा फटका बसला आहे. अनेक लहान-मोठ्या नाल्यांना पूर आल्याने गावांमध्ये पाणी शिरले असून, शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीत एक २७ वर्षीय तरुण वाहून गेल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
गावांमध्ये पाणी शिरले, शेतीचे मोठे नुकसान..
मुसळधार पावसामुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले असून, जीवनावश्यक वस्तूंचे मोठे नुकसान झाले आहे. कुऱ्हा येथील बाजारपेठेतही पाणी शिरल्याने व्यापाऱ्यांची धावपळ उडाली. या अचानक आलेल्या पावसामुळे शेतीत उभ्या असलेल्या पिकांचे आणि जमिनीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक शेतजमिनी खरडून गेल्या आहेत. मुक्ताईनगर तालुक्यातील कुन्हा व जोधनखेडा गावांमध्येही घरांमध्ये पाणी शिरले असून, पूर परिस्थिती निर्माण झाली आहे.
२७ वर्षीय युवक पुरात वाहून गेल्याची भीती..
या नैसर्गिक आपत्तीत एक दुर्दैवी घटना घडली आहे. काकोडा येथील २७ वर्षीय किरण मधुकर सावळे हा युवक पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्याचा शोध घेण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत.
प्रशासनाचे मदतकार्य सुरू..
या घटनेची माहिती मिळताच मुक्ताईनगरचे तहसीलदार गिरीश वखारे यांनी तात्काळ कुऱ्हा गावाकडे धाव घेतली, परंतु धामणगाव-देशकुंडा जवळील नाल्याला पूर आल्याने त्यांचा मार्ग थांबला आणि ते तिथेच अडकून पडले. प्रशासनाकडून तातडीने मदतकार्य सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, मात्र सततच्या पावसामुळे मदतकार्यात अडथळे येत आहेत.
बाधित कुटुंबांना मदत, पंचनामे सुरू..
संबंधीत तालुक्यांचे प्रांताधिकारी, तहसीलदार, महसूल व कृषी खात्याचे अधिकारी नुकसानीची पाहणी करून पंचनामे करत आहेत. बाधित कुटुंबांसाठी तातडीने अन्न, पिण्याचे पाणी आणि बिछायतची व्यवस्था करण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाने सांगितले की, आपत्तीग्रस्तांना शासनाकडून मदत व नुकसानभरपाई लवकरात लवकर मिळावी यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. नागरिकांनी शांतता व संयम बाळगून प्रशासनाशी सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्र्यांसह जिल्हा प्रशासनाने केले आहे.