जळगाव, (प्रतिनिधी) : उपविभागीय अधिकारी कार्यालयातील सहायक महसूल अधिकारी गणेश बाबुराव लोखंडे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) ₹१५,००० ची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. जमिनीशी संबंधित एका कामासाठी लोखंडे यांनी ही लाच मागितली होती.
एका तक्रारदाराची पत्नीच्या नावावर असलेल्या शेतजमिनीतील ‘पोट खराब’ क्षेत्र ‘लागवडीखालील’ म्हणून नोंदवण्यासाठी लोखंडे यांनी ₹१५,००० लाचेची मागणी केली होती. ही जमीन लागवडीखाली असूनही सरकारी दप्तरी ‘पोट खराब’ म्हणून नोंद असल्यामुळे तक्रारदाराला शेतीत मिळणाऱ्या सरकारी सुविधा आणि कर्ज मिळत नव्हते. त्यामुळे तक्रारदाराने लोखंडे यांची भेट घेतली.
या कामासाठी लोखंडे यांनी ₹१५,००० मागितले, त्यापैकी तक्रारदाराने आधीच ₹५,००० दिले होते. उर्वरित ₹१०,००० स्वीकारल्यानंतरच काम होईल, असे लोखंडे यांनी सांगितले होते. पण तक्रारदाराला उर्वरित रक्कम द्यायची नव्हती. त्यामुळे त्यांनी ९ सप्टेंबर रोजी एसीबीकडे तक्रार केली.
एसीबीने तक्रारीची पडताळणी केली असता, लोखंडे यांनी यापूर्वीच ₹५,००० स्वीकारल्याचे आणि उर्वरित ₹१०,००० ची मागणी केल्याचे समोर आले. या माहितीच्या आधारे एसीबीने १० सप्टेंबर रोजी सापळा रचला. लोखंडे यांनी तक्रारदाराकडून ₹१०,००० स्वीकारताच त्यांना एसीबीच्या पथकाने पंचांसमोर रंगेहात पकडले. या प्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात लोखंडे यांच्या विरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही सापळा कारवाई पोलिस उपअधिक्षक योगेश ठाकूर यांच्या मागदर्शना खाली पोलिस निरीक्षक हेमंत नागरे, पोशि.भुषण पाटील, राकेश दुसाने, अमोल सुर्यवंशी यांनी केली. पुढील तपास सुरू आहे.