रोख रक्कम, मोबाईल आणि वाहन जप्त
जळगाव, (प्रतिनिधी) : चारचाकी वाहनातून लिफ्ट देण्याच्या बहाण्याने एका तरुणाची हातचलाखी करून २२,५००/- रुपये रोख रक्कम आणि मोबाईल फोनची चोरी करणाऱ्या दोन चोरट्यांना एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून चोरीचा संपूर्ण मुद्देमाल आणि गुन्ह्यात वापरलेली मारुती अर्टिगा कार जप्त केली आहे.
नेमकं काय घडलं?
२५ ऑगस्ट रोजी दुपारी १२.३० वाजता एक तरुण धुळे येथे जाण्यासाठी अजिंठा चौकातील बस स्टॉपवर बसची वाट पाहत होता. त्याच वेळी एक चारचाकी वाहन त्याच्याजवळ थांबले. त्यातील अज्ञात व्यक्तींनी त्याला कुठे जायचे आहे असे विचारले. त्याने धुळे येथे जाण्याबद्दल सांगितले असता, ‘आम्ही तुम्हाला सोडून देतो,’ असे सांगून त्याचा विश्वास संपादन केला. त्यानंतर त्याला पुढील सीटवर दाटीवाटीने बसवले आणि काही अंतर गेल्यावर गाडीत जागा नसल्याचे कारण देत त्याला खाली उतरवले. गाडीतून उतरल्यानंतर तरुणाने पाहिले असता, त्याच्या खिशातील मोबाईल आणि २२,५००/- रुपये रोख रक्कम चोरीला गेल्याचे त्याच्या लक्षात आले. त्याने तात्काळ एमआयडीसी पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली.
पोलिसांची तत्पर कारवाई..
पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांनी तात्काळ गुन्हे शोध पथकातील पोउनि राहुल तायडे, पोउनि चंद्रकांत धनके, सफौ विजयसिंग पाटील, पोहेकॉ गणेश शिरसाळे, प्रमोद लाडवंजारी, किरण चौधरी, गिरीश पाटील, प्रदीप चौधरी, नरेंद्र मोरे यांना घटनास्थळी रवाना केले. त्यांनी सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपास सुरू केला.
या पथकाने नशिराबाद येथील बाजार परिसरात सापळा रचून संशयित आरोपी वसिम अजमल खान (वय ३५) आणि जाफर उल्ला कहुल्ला कासार (वय ४२) यांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान, त्यांनी इतर दोन साथीदारांच्या मदतीने हा गुन्हा केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्याकडून २२,५००/- रुपये रोख, चोरी केलेला मोबाईल फोन आणि गुन्ह्यासाठी वापरलेली सुमारे ५,००,०००/- रुपये किमतीची मारुती अर्टिगा कार जप्त केली आहे.
आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या आरोपींवर यापूर्वीही विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असून, पुढील तपास पोना प्रदीप चौधरी करत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि पोलीस उप अधीक्षक नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.