अमळनेर, (प्रतिनिधी) : अमळनेर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने मोठी कारवाई करत अवैध गावठी बनावटीचे पिस्तूल आणि जिवंत काडतुसे विकणाऱ्या दोघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून १.६६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही घटना २८ ऑगस्ट रोजी घडली.
अमळनेर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांना गोपनीय माहिती मिळाली की, अमळनेर-चोपडा रस्त्यावर दोन व्यक्ती गावठी पिस्तूल विकण्यासाठी येणार आहेत. या माहितीच्या आधारे त्यांनी तात्काळ गुन्हे शोध पथकाला सोबत घेऊन सापळा रचला.
आसाराम बापू आश्रमासमोर दोन संशयित व्यक्ती पोलिसांना पाहताच त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी त्यांना शिताफीने रात्री १०.३० च्या सुमारास पकडले. चौकशीत त्यांनी आपली नावे विशाल भैय्या सोनवणे (वय १८, रा. ढेकुसिम, ता. अमळनेर) आणि गोपाल भिमा भिल (वय ३०, रा. सत्रासेन, ता. चोपडा) अशी सांगितली. पोलिसांनी त्यांची झडती घेतली असता, त्यांच्याकडे दोन गावठी बनावटीचे पिस्तूल, सहा जिवंत काडतुसे आणि दोन मोटारसायकली आढळून आल्या. या वस्तूंचा परवाना विचारला असता त्यांच्याकडे कोणताही परवाना नसल्याचे त्यांनी सांगितले.
जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालात दोन पिस्तूल (६०,००० रुपये), सहा जिवंत काडतुसे (६,००० रुपये) आणि दोन मोटारसायकली (१,००,००० रुपये) यांचा समावेश आहे. एकूण १ लाख ६६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी अमळनेर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नामदेव आनंदा बोरकर करत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
सार्वजनिक आवाहन:
विना परवाना शस्त्रे आणि प्राणघातक हत्यारे बाळगणे गुन्हा असून पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणत्याही व्यक्तीकडे बेकायदेशीर शस्त्रे आढळल्यास, त्याची माहिती पोलिसांना द्यावी. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवले जाईल आणि संबंधित व्यक्तीवर कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल.