जळगाव, (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला तिची आई आणि चुलत बहीण व मेहुण्याने जबरदस्तीने लग्न लावून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नानंतर पतीने मारहाण केल्याने ती आपल्या बहिणीकडे परत आली. मात्र, नंतर तिने प्रियकरासोबत पळून जाऊन त्याच्याशी शारीरिक संबंध ठेवले. याप्रकरणी पोलिसांनी मुलीची आई, पती, प्रियकर, आणि त्यांना मदत करणाऱ्यांसह एकूण १० जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
रावेर तालुक्यातील एका गावात राहणारी ही मुलगी जून महिन्यात आपल्या आईसोबत जळगावात चुलत बहिणीकडे आली होती. इथेच तिचे चांगदेव येथील एका तरुणासोबत जबरदस्तीने लग्न लावून देण्यात आले. लग्नानंतर पतीने तिला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यामुळे ती पुन्हा आपल्या चुलत बहिणीकडे जळगावात परत आली.
तिथून बहिणीच्या दिराने तिला घराबाहेर काढले. त्यानंतर तिने तिच्या प्रियकराशी संपर्क साधला आणि त्याला जळगावात बोलावले. प्रियकर तिला कुसुंबा येथील एका महिलेकडे घेऊन गेला. तिथे राहत असताना त्यांच्यात शारीरिक संबंध आले. हा प्रकार मुलीच्या आईच्या लक्षात आल्यावर त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. तिथे मुलीने संपूर्ण प्रकाराची फिर्याद दिली.
त्यानुसार, पोलिसांनी मुलीची आई, चुलत बहीण, चुलत मेहुणा, मेहुण्याचा भाऊ, मुलीचा पती, पतीचे मामे सासरे, मामे सासू, प्रियकर, आणि त्याला राहण्यासाठी मदत करणारी महिला, अशा एकूण १० जणांवर ३१ ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा पुढील तपासासाठी शनिपेठ पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक साजिद मन्सुरी या प्रकरणाचा तपास करत आहेत.