यावल, (प्रतिनिधी) : तालुक्यातील दहिवगाव-विरावली रस्त्यावर एका २१ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. इम्रान युनुस पटेल (वय २१, रा. दहिवगाव) असे मयत तरुणाचे नाव असून, या प्रकरणात ज्ञानेश्वर गजानन पाटील आणि गजानन रवींद्र कोळी (दोघेही १९ वर्षे) या दोन संशयित आरोपींनी स्वत:हून यावल पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण केले आहे.
प्राथमिक माहितीनुसार, ही घटना दहिवगाव-विरावली रस्त्यावरील खिरवा रस्त्यावर घडली. खून झालेला तरुण इम्रान पटेल हा मूळचा हनुमंतखेडा, तालुका धरणगाव येथील रहिवासी असून, तो दहिवगाव येथे आपल्या मामाकडे राहत होता. हत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी, संशयित आरोपींनी इम्रानची हत्या करून त्याच्या मोटरसायकलसह थेट पोलीस ठाण्यात धाव घेतल्याने या घटनेची परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला. रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. या हत्येमागील नेमके कारण आणि पुढील तपास पोलीस करत आहेत.