चोपडा, (प्रतिनिधी) : शहरात एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या अत्याचारामुळे पीडित मुलगी गर्भवती राहिली असून, पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीला अटक केली आहे.
या प्रकरणात, अविनाश वेस्ता पावरा (वय २२, रा. अंमलवाडी, ता. चोपडा) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याला अमळनेर येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
काय आहे प्रकरण?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाहेरच्या तालुक्यातील ही अल्पवयीन मुलगी बारावीचे शिक्षण घेत आहे. संशयित आरोपी अविनाश पावरा याने जानेवारी २०२३ पासून पीडित मुलीवर अनेकदा अत्याचार केला. यात चोपडा शहरातील शिरपूर रोडवरील एका हॉस्पिटलच्या मागे, मैत्रिणीच्या खोलीत आणि झाडझुडपांमध्ये असे विविध ठिकाणी अत्याचार करण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. २६ जून २०२५ रोजीही त्याने अत्याचार केला.
पीडित मुलीच्या वैद्यकीय तपासणीत ती गर्भवती असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर, पीडितेने चोपडा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून पोलिसांनी संशयित अविनाश पावरा विरोधात गुन्हा दाखल केला आणि त्याला अटक केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.