जळगाव, (प्रतिनिधी) : ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात भरधाव वेगात असलेल्या एका रिक्षाने रस्त्याच्या कडेला खेळत असलेल्या सहा वर्षांच्या बालिकेला धडक दिली. या भीषण अपघातात मनिषा देवसिंग पावरा (वय ६, रा. नागलवाडी, ता. चोपडा, ह.मु. गणेशपुरी, मेहरुण) या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना मंगळवारी (२६ ऑगस्ट) दुपारी जळगावातील गणेशपुरी परिसरात घडली. या प्रकरणी रिक्षाचालकाविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मनिषाची आई बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी काम करत असताना मनिषा रस्त्याच्या समोर खेळत होती. त्याचवेळी एक रिक्षाचालक दुसऱ्या वाहनाला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत होता. यावेळी रिक्षावरील नियंत्रण सुटले आणि ती थेट मनिषा ला धडकली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या मनीषाला तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
अपघातानंतर रिक्षाचालक घटनास्थळावरून पसार झाला. एमआयडीसी पोलीस त्याचा शोध घेत आहेत. निष्काळजीपणे वाहन चालवणाऱ्या चालकामुळे एका निष्पाप चिमुकलीचा बळी गेल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.